मुंबई : भारताचे क्रिकेटपटू सध्या चांगलेच चर्चेत आहेत. न्यूझीलंडमध्येभारताने ट्वेन्टी-२० मालिकेत ५-० असे निर्भेळ यश संपादन केले आहे. त्यामुळे चांगल्या कामगिरीमुळे काही क्रिकेटपटू चर्चेत येतात. काही क्रिकेटपटू तर सुट्टी एन्जॉय करताना चर्चेत येतात. पण भारताचा एक क्रिकेटपटू तर आपल्या बायकोमुळे चर्चेत आला आहे.
एखाद्या क्रिकेटपटून किंवा त्याचा पत्नीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला तर त्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो. काही वेळा चाहते त्यांना डोक्यावर घेतात तर काही वेळा ट्रोल करतात. तशीच एक गोष्ट सध्या घडताना दिसत आहे. एका क्रिकेटपटूच्या पत्नीने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या फोटोवर भाष्य करण्यापेक्षा एका चाहत्याने तिच्या पतीला ट्रोल करायचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने सडेतोड उत्तर त्या चाहत्याला दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
हा क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू आहे. पण सध्याच्या घडीला तो प्रकाशझोतात नाही. या क्रिकेटपटूची पत्नी क्रिकेटशी संलग्न प्रोफेशनमध्येच आहे. तिच्या सौंदर्याची नेहमीच जोरदार चर्चा होत असते. त्यामुळेच क्रिकेटच्या संबंधित कार्यक्रमामध्ये ती बऱ्याचदा पाहायला मिळते. यावेळी तिच्या सौंदर्यांबरोबर पेहरावांचीही जोरदार चर्चा होते.
कोणाबरोबर घडली ही गोष्ट
भारताचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आणि त्याची पत्नी व अँकर मयांती लँगर यांच्याबरोबर ही गोष्ट घडलेली पाहायला मिळाली. मयांतीने आपला एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर हा सारा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.
![A troll tries to take jibe at Stuart Binny, Mayanti Langer gives a befitting response | ट्रोल ने की स्टुअर्ट बिन्नी का मजाक उड़ाने की कोशिश, मयंती लैंगर ने यूं दिया करारा जवाब]()
नेमके घडले तरी काय...
मयांती लँगरने एका स्टुडिओमधला आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोखाली एका चाहत्याने स्टुअर्ट कुठे दिसत नाही, असा खोचक प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मयांती म्हणाली की, " माझ्या समोरील गोष्टींचा मीच सामना करते. तुमचे धन्यवाद. सध्या स्टुअर्ट हा क्रिकेट खेळण्यात व्यग्र आहे. त्याचे चांगलेच सुरु आहे. ज्या लोकांना तो ओळखत नाही त्यांच्यावर तो कधीच कमेंट करत नाही."