Join us

दक्षिण आफ्रिका बोर्डाच्या निर्णयाने खळबळ; भारताविरुद्धच्या टेस्टआधी द्यावे लागले स्पष्टीकरण

बोर्डाने स्पष्टपणे लिहिले आहे की, आम्ही कसोटी क्रिकेटचा खूप आदर करतो, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:39 IST

Open in App

South Africa Cricket Board Clarification: दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. याचे कारण खेळाडू आणि दक्षिण आफ्रिका बोर्डाने घेतलेला एक निर्णय. या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकेवर चाहते आणि जाणकार चांगलेच खवळले आहेत. त्यांच्यावर इतकी टीका करण्यात आली आहे की, आता क्रिकेट बोर्डाने आपल्या निर्णयावर स्पष्टीकरण दिले आहे.

केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हे स्पष्टीकरण आले आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्यांच्या निवड समितीने निवडलेला संघ हे दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या टीकेचे कारण आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने अतिशय तरुण संघ निवडला आहे. या संघाचे नेतृत्व नील ब्रँडकडे असेल. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा नील हा दुसरा क्रिकेटर असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताविरुद्ध खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात केवळ तीन सदस्य आहेत.

याचे कारण म्हणजे जेव्हा दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे, तेव्हा टी-20 लीग SA20 सुरू असेल आणि त्यांचे प्रमुख खेळाडू त्यात व्यस्त असतील. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डावर टीका होत असून, दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यांना महत्त्व देत नाही, त्यामुळे महत्त्वाच्या मालिकेसाठी नव्या संघाची निवड केल्याचे बोलले जात आहे. आता दक्षिण आफ्रिकेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

या स्पष्टीकरणात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने स्वतःला असहाय घोषित केले आहे. बोर्डाने स्पष्टपणे लिहिले आहे की ते कसोटी क्रिकेटचा खूप आदर करते. बोर्डाने स्पष्टपणे लिहिले आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक 2022 मध्येच जाहीर करण्यात आले होते आणि त्यावेळी SA20 लीगचे वेळापत्रक तयार करण्यात आले नव्हते. दोन्ही तारखा एकमेकांशी भिडतील हे स्पष्ट झाल्यावर, दोन्ही गोष्टी वेळेवर पार पडतील याची खात्री करण्यासाठी बोर्डाने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हा निर्णय न्यूझीलंड क्रिकेटशी सल्लामसलत करून घेण्यात आला.

बोर्डाने सांगितले की ही मालिका एप्रिल 2024 पूर्वी खेळवली जाणार होती आणि त्यामुळे मध्यममार्ग शोधला गेला. बोर्डाने लिहिले आहे की, याशिवाय उर्वरित वेळापत्रक निश्चित आहे आणि याचा एसए20 लीगच्या वेळापत्रकाशी कोणताही संघर्ष होणार नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्ण पाठिंबा देत असून SA20 मजबूत करण्यावर बोर्डाचा भर असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाद. आफ्रिकान्यूझीलंडटी-20 क्रिकेट