भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) मागील दोन वर्ष फॉर्माशी झगडतोय... त्याला अडीच वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. कोहलीची बॅट त्याच्यावर रूसल्याचे दिसतेय आणि मालिकांमागून मालिका त्याच्या कामगिरीचा आलेख उतरता दिसतोय. इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली विश्रांतीवर आहे आणि त्यामुळे तो वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत खेळलेला नाही.
आता आशिया चषक ( Asia Cup 2022) स्पर्धेतून तो पुनरागमनासाठी सज्ज आहे आणि त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यात आशिया चषक स्पर्धेत पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत फिटनेस, मेंटर हेल्थ या विषयांवर त्याचे मत मांडले.एका मालिकेनंतर पुढील मालिकेसाठी कशी तयारी करतो, या प्रश्नावर विराट म्हणाला, मी माझ्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतो आणि जे आवडतं तेच करतो. तणाव कमी करण्यासाठी अनेकदा फिरायला जातो.
फिटनेससाठी आग्रही असलेला विराट कधीच वर्कआऊट मिस करत नाही. ''वर्कआऊट मला पुढे चालत राहण्यासाठी मदत करतं. त्यामुळेच मी कधी वर्कआऊट मिस करत नाही. त्याने मला लक्ष्य केंद्रीत करण्यास खूप मदत मिळते. यातून मला रोज नवनवीन आव्हानं मिळतात,''असे त्याने सांगितले.
तो पुढे म्हणाला, एक खेळाडू म्हणून तुम्हाला सर्वोत्तम द्यायला लागतं. पण, अनेकदा एवढं दडपण असतं की ज्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. हा खूप गंभीर विषय आहे आणि प्रत्येकवेळी तुम्ही कणखर राहू शकत नाही. मला अनेकदा असा अनुभव आला आहे. एका खोलीत प्रियजन असूनही मला एकटं पडल्यासारखं वाटलं होतं. असं अनेकांच्या बाबतित घडतं. त्यामुळेच स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आयुष्यात समतोल राखणे गरजेचा आहे.