Join us
Daily Top 2Weekly Top 5

England vs India: ऐतिहासिक ‘लॉर्डस्’ जिंकण्याचे लक्ष्य; आजपासून दुसरी कसोटी, भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने  संघाबाहेर गेला आहे.  त्यामुळे अश्विनच्या पुनरागमानाची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 10:33 IST

Open in App

लंडन : पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर आता ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांवर विशेष जबाबदारी असेल. पहिल्या सामन्यातील भारताची विजयाची संधी पावसाने हिरावल्यानंतर विराट सेना नव्या आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल. मात्र, यावेळी भारताच्या फलंदाजांना आपल्या लौकिकानुसार खेळ करावा लागेल. भारतीय संघात बदलाची शक्यता कमी असली, तरी यावेळी कर्णधार कोहली आपला सर्वोत्तम ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याला अंतिम संघात स्थान देऊ शकतो. मात्र, या सामन्यात भारताच्या तीन प्रमुख फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरीची आशा आहे. स्वत: कर्णधार कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना पहिल्या सामन्यात यश आले नव्हते. २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात रहाणेने लॉर्ड्सवर शतक झळकावण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीयांच्या सर्व नजरा रहाणेवर असतील.वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने  संघाबाहेर गेला आहे.  त्यामुळे अश्विनच्या पुनरागमानाची शक्यता आहे. कारण विराट कोहलीला संघात २० बळी मिळवून देणारे गोलंदाज खेळवायचे आहे. त्यात चार वेगवान गोलंदाज खेळवायचे असतील तर तो ठाकूरच्या जागी इशांत शर्मा व उमेश यादव यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकेल. पहिल्या कसोटीनंतर कोहलीने ४ वेगवान आणि एक फिरकी गोलंदाज कायम ठेवत खेळण्याचे संकेत दिले होते. पण त्याचवेळी परिस्थितीनुसार यामध्ये बदलही करण्यात येईल, असेही सांगितले होते. लॉर्ड्सवरील खेळपट्टी पाहूनही संघात बदल करण्यात येईल. खेळपट्टी हिरवीगार राहिल्यास वेगवान गोलंदाजांना अधिक प्राधान्य राहिल, अन्यथा अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही आघाडीच्या फिरकीपटूंसह कोहली यजमानांविरुद्ध भिडेल. दुसरीकडे, भारताप्रमाणेच इंग्लंडसाठीही फलंदाजांचे अपयश चिंतेची बाब ठरत आहे. कर्णधार जो रुटचा अपवाद वगळता इतर कोणालाही भारतीय गोलंदाजांचा ठामपणे सामना करता आला नाही. युवा फलंदाजांनी इंग्लंडला अत्यंत निराश केले आहे. इंग्लंडसाठी आणखी चिंता म्हणजे वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची दुखापत. त्यामुळे यजमानांना दुसऱ्या सामन्यात त्याच्याविना खेळावे लागू शकते. खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक ठरल्यास मोईन अलीला संघात स्थान मिळू शकेल, नाहीतर वेगवान गोलंदाज मार्क वूड हा ब्रॉडची जागा घेईल.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव.इंग्लंड : जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, डोम बेस, मोईन अली, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉली, सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डोम सिबली आणि मार्क वुड.

जडेजा याने पहिल्या कसोटीत धावा केल्या आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात अधिक आत्मविश्वासाने उतरेल. तळाचे फलंदाज देखील योगदान देत आहे. शार्दुलमध्ये धावा करण्याची क्षमता आहे. मात्र पुजारा, अजिंक्य आणि मी स्वत: खूप धावा केलेल्या नाही. त्यामुळे ठाकूरच्या पर्यायावर विचार करतांना त्याच्या फलंदाजी क्षमतेपेक्षा जो २० बळी मिळवण्यात कसा उपयोगी ठरेल याचा विचार करत आहेत.     - विराट कोहली 

राहुलची जागा निश्चितमयांक अग्रवालच्या जागी लोकेश राहुलने दमदार अर्धशतक झळकावत आपली जागा निश्चित केली आहे. तरीही दुसऱ्या सामन्यात मयांकला संघात स्थान मिळाले, तर राहुलला मधल्या फळीत खेळविण्याचा विचार होऊ शकतो. त्याचवेळी, पुजारा आणि कोहली फॉर्ममध्ये नसले, तरी त्यांना संघाबाहेर बसविले जाणार नसल्याचे कळते. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीइंग्लंडभारतक्रिकेट सट्टेबाजी
Open in App