England vs India, 1st Test : भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रंगला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात साई सुदर्शनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तो फलंदाजी करताना दिसेल. पुजाराने त्याला कॅप दिली. याशिवाय करुण नायरसह शार्दुल ठाकूरलाही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (विकेट किपर बॅटर आणि उप कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन
झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक,बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिथ (यष्टीरक्षक),क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स,जोश टंग, शोएब बशीर.
केएल राहुल-यशस्वी जैस्वालवर मोठी जबाबदारी
लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात नाणेफेक जिंकून कर्णधार पहिल्यांदा गोलंदाजी घेण्यालाच पसंती देतो. बेन स्टोक्सनं अगदी तेच केले. दुसरीकडे नाणेफेक जिंकली असती तर गोलंदाजी करण्यालाच पसंती दिली असती, असे सांगत शुबमन गिलनंही नाणेफेकीचे महत्त्व बोलून दाखवले. आता यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुलवर मोठी जबाबदारी असेल. या जोडीनं पहिला सेशन विकेट लेस खेळून काढला तर भारतीय संघासाठी ही चांगली सुरुवात ठरेल.