England Announced Playing XI, IND vs ENG 1st ODI : भारत विरूद्ध इंग्लंड वनडे मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. मालिकेचा पहिला सामना नागपूरला रंगणार असून त्यासाठी इंग्लंड आपली 'प्लेइंग ११' जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे सामन्याच्या आदल्या दिवशी जाहीर केलेल्या संघात इंग्लंडने एका खास खेळाडूला स्थान दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे, २०२३ नंतर तब्बल ४५२ दिवसांनी त्याला इंग्लंडच्या वनडे संघात स्थान मिळाले आहे. तो स्टार खेळाडू म्हणजे इंग्लंडचा तुफान फॉर्मात असलेला फलंदाज जो रूट (Joe Root) . जो रूटने शेवटचा वनडे सामना २०२३च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर आता तो उद्या खेळताना दिसणार आहे.
पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची अनुभवाला पसंती
इंग्लंडच्या वनडे संघात टी२० संघापेक्षा फारसा बदल करण्यात आलेला नाही. बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. हॅरी ब्रुक आणि लियम लिव्हिंगस्टन यांचीही संघात निवड झाली आहे. जो रूट तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. याशिवाय, जेकब बेथेल देखील संघाचा भाग असणार आहे. तर गोलंदाजीत ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद हे तिघे वेगवान गोलंदाज संघात आहेत. त्यासह अनुभवी फिरकीपटू आदिल रशीदला संघात फिरकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
पहिल्या वनडे साठी इंग्लंडचा संघ- बेन डकेट, फिल सॉल्ट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर, लियम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद
इंग्लंड ४१ वर्षांपासून भारतात वनडे मालिकाविजयाच्या प्रतिक्षेत
टी२० मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंडसाठी वनडे मालिकाही आव्हानात्मक असेल. या फॉरमॅटमध्ये इंग्लंडने ४१ वर्षांपासून भारतात मालिका जिंकलेली नाही. इंग्लंडने १९८४ मध्ये भारतात शेवटची वनडे मालिका जिंकली होती. तसेच, भारत-इंग्लंड यांच्यात शेवटची वनडे मालिका २०२१ मध्ये झाली होती, जी भारतीय संघाने २-१ ने जिंकली होती.