ENG W vs IND W 1st ODI : टी-२० तील ऐतिहासिक मालिका विजयानंतर भारतीय महिला संघाने वनडे मालिकेची सुरुवात अगदी धमाक्यात केलीये. बुधवारी साउथहॅम्प्टन येथील द एजस बाउल स्टेडियमवर रंगलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने धावांचा यशस्वी पाठलाग करताना यजमान इंग्लंड संघाला ४ विकेट्स राखून पराभूत केले आहे. या विजयासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतलीये. मागील १२ वनडे सान्यातील भारतीय महिला संघाचा हा ११ विजय असून आगामी महिला वनडे वर्ल्ड कप आधी दिसणारी ही आकडेवारी भारतीय महिला क्रिकेटमधील 'अच्छे दिन' आल्याचे संकेत देणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन अर्धशतकांवर भारी पडली दीप्तीची नाबाद अर्धशतकी खेळी
घरच्या मैदानात नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सोफिया डंकले ८३ (९२) आणि एलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स ५३ (७३) या दोघींनी अर्धशतकासह केलेल्या १०६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर यजमान संघाने निर्धारित ५० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २५८ धावा करत भारतीय महिला संघासमोर २५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून क्रांती गौड, स्नेह राणा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय अमनजोत कौर आणि श्री चारणी या दोघींनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. दीप्तीच्या नाबाद अर्धशतकासह जेमिमा रॉड्रिग्सनं केलेल्या उपयुक्त ४८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने ४ विकेट्स आणि १० चेंडू राखून सामना जिंकला. सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय महिला संघाचा हा दुसरा विजय ठरला. इंग्लंडकडून चार्ली डीन हिने सर्वाधिक २ तर लॉरेन बेल, सोफी एसलस्टोन, लॉरेन फाइलर यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
खेळभावना जोपासते, ते खरे क्रिकेटवेड!
भारतीय महिला संघाने सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड
- २६५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया- मॅके, २०२१
- २५९ विरुद्ध इंग्लंड, साउथहॅम्प्टन, २०२५
- २५२ विरुद्ध न्यूझीलंड-, क्वीन्सटाऊन, २०२२
- २४८ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वडोदरा, २०१९
- २४५ विरुद्ध दक्षिणआफ्रिका, कोलंबो, २०१७
दीप्ती शर्मासह जेमिमानं टीम इंडियाच्या बाजूनं सेट केला सामना
इंग्लंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताची उप कर्णधार स्मृती मानधना २८ (२४) आणि प्रतिका रावल ३६ (५१) या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. हरलीन देओल २७ (४४) आणि हरमनप्रीत कौर १७ (२७) या दोघी माघारी फिरल्यावर सामना इंग्लंडच्या बाजून झुकला होता. पण त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा जोडी जमली. दोघींनी पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. जेमिमाचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकले. तिने ५४ चेंडूत ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दीप्तीनं ६४ चेंडूत ६२ धावांच्या नाबाद खेळीसह संघाच्या पहिल्या विजयात मोलाचा वाटा उचलला. धावांचा पाठलाग करताना दीप्तीनं केलेली खेळी ही विक्रमी ठरली. भारतीय महिला संघाकडून ६ व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोणत्याही भारतीय बॅटरनं केलेली ही सर्वोच्च खेळी आहे. याआधी २०१६ मध्ये वेदा कृष्णमूर्ती हिने वेस्ट इंडिज विरुद्ध ५२ धावांची नाबाद खेळी केली होती.
Web Title: ENG W vs IND W 1st ODI Deepti Sharmas Unbeaten Half Century Helps India Beat England By Four Wickets To Take Series Lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.