मेलबर्न : सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. आज मालिकेतील अखेरचा अर्थात तिसरा सामना खेळवला जात आहे. कांगारूच्या संघाने पहिले दोन सामने जिंकून 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मंगळवारी तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात वॉर्नरने 103.92 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत शतक झळकावले. एवढेच नाही तर यानंतर त्याने आपल्या एका छोट्या चाहत्याला भेट दिली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
डेव्हिड वॉर्नरनेइंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये 102 चेंडूत 106 धावांची खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. यानंतर त्याला ओली स्टोनने तंबूत पाठवले. दरम्यान, पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने आपले ग्लोव्ह्ज चिमुकल्या चाहत्याला देऊन सर्वांची मनं जिंकली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
1043 दिवसांनंतर ठोकले शतक
डेव्हिड वॉर्नरने मोठ्या कालावाधीनंतर शतक झळकावले आहे. खंर तर त्याने तब्बल 1,043 दिवसांनंतर शतकी खेळी केली. वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 19 शतके झळकावली आहेत. व्हाईट बॉलच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 20 शतकांची नोंद आहे. या सामन्यात त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत पहिल्या बळीसाठी एकूण 269 धावांची भागीदारी केली.
पावसामुळे सामन्यात व्यत्यय
पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्हीही डावातील 2-2 षटके कमी करण्यात आली आहेत. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड (152) आणि डेव्हिड वॉर्नर (106) या दोघांनी एकूण 269 धावा केल्या. कांगारूच्या संघाने निर्धारित 48 षटकांमध्ये एकूण 355 धावा केल्या आहेत. आता इंग्लिश संघाला आपले अस्तित्व राखण्यासाठी 48 षटकांत 356 धावांची आवश्यकता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"