अयाज मेमन
कन्सल्टिंग एडिटर
घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत भारतीय संंघ दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव करेल, अशी अपेक्षा होती. पण, घडले विपरीत! पाहुण्या संघाने यजमानांना सर्व आघाड्यांवर चारीमुंड्या चीत केले. यामुळे केवळ खेळाडूच नव्हे, तर प्रशिक्षक गौतम गंभीर, निवडकर्ते आणि बोर्डावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. गंभीर यांच्या मार्गदर्शनात घरच्या मैदानावरील मागच्या सात कसोटींपैकी ५ सामन्यांत भारत पराभूत झाला. कर्णधार मात्र वेगवेगळे होते. भारताने कमकुवत विंडीजवर २-० असा मालिका विजय नोंदविला, ही त्यातल्या त्यात दिलासादायी बाब होती. पण, असे निकाल का? असे निकाल का येत आहेत, हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो.
दोन मालिकेत निष्प्रभ होणे कुठे तरी खटकले. न्यूझीलंडने ३-० असेच नमविले होते. त्यामुळे भारत २०२२-२०२४ च्या डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर या डब्ल्यूटीसी चक्रातही अशीच चिन्हे निर्माण झाली. भारताला पुढील कसोटी सामना आठ महिन्यांनंतर खेळायचा आहे. तोवर संघात किती बदल होतील, हे कुणालाही ठाऊक नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका का गमावली? याचे प्रमुख कारण आहे, भारतीय फलंदाज फिरकीला पूरक असलेल्या खेळपट्टीवर खेळण्यास सज्ज नव्हते. कारण स्थानिक सामन्यातही खेळपट्टी वेगवान माऱ्यास पूरक अशी तयार करण्यावर भर दिला जात आहे. विदेशातील खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाज वेगवान माऱ्यापुढे भक्कमपणे उभे राहावेत, यासाठी हा अट्टहास केला जातो. या मुद्यावरदेखील विचार करण्याची वेळ आली आहे.
कारणे देऊ नका!
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ त्यांच्या स्थानिक खेळपट्ट्यांवर कोणत्या फिरकीपूरक खेळपट्ट्यांवर खेळतात? तरीही भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर यशस्वी ठरत आहेत. त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज आमच्या खेळपट्ट्यांवर यशस्वी होत असतील, तर यजमान खेळाडूंना झाले तरी काय? भारतासाठी हा संक्रमण काळ आहे. अनेक जण अनुभवहीन आहेत; पण हा बहाणा ठरू नये. जडेजा, राहुल, बुमराह, सिराज, पंत, गिल व जैस्वाल यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा मोठा अनुभव आहे.
आफ्रिकेची फिरकी भेदक...
भारताने दक्षिण आफ्रिकेला कमकुवत मानण्याची चूक केली. बावुमाचा संघ मागच्या डब्ल्यूटीसीत चॅम्पियन आहे, हे आपण विसरलो. त्यांनी पाकिस्तानला १-१ असे रोखले. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी ३३ बळी घेतले होते. याचा अर्थ दक्षिण आफ्रिका संघ फिरकीला पूरक खेळपट्ट्यांचा किती अभ्यास करून आला होता, हे निष्पन्न होते. भारताने, दक्षिण आफ्रिकेने अलीकडे काय-काय केले याचा अभ्यास करायला हवा होता.
फलंदाजी क्रमातील गोंधळ
बावुमाचे नेतृत्व वाखाणण्याजोगे होते. दुसरीकडे, भारतीय व्यवस्थापक संघ निवड आणि डावपेच यात अडकत गेला. चार फिरकीपटूंना खेळविणे, त्यातही तीन डावखुरे गोलंदाज हा कोणत्या डावपेचांचा भाग होता? दोन्ही सामन्यांत आमच्या फलंदाज-गोलंदाजांच्या उणिवा चव्हाट्यावर आल्या. वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या स्थानावर खेळविणे, नंतर दुसऱ्या सामन्यात आठव्या स्थानावर खेळविणे, साई सुदर्शनला तिसऱ्या स्थानावर उतरविणे, नितीश रेड्डीची उपयोगिता, या सर्व गोष्टींमध्ये स्पष्टपणा नव्हताच.