Yuvraj Singh Robin Uthappa Suresh Raina, betting App ED : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, सुरेश रैना आणि आणखी काही सेलिब्रिटी यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) लवकरच मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) काही नामांकित खेळाडू आणि अभिनेते-अभिनेत्री यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
मालमत्ता जप्त का केली जाणार?
या प्रकरणात संबंधित व्यक्तींनी ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्ममधून मिळालेला पैसा विविध मार्गांनी गुंतवणुकीसाठी वापरल्याचा आरोप आहे. EDच्या तपासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला असून यासंदर्भात अधिक कसून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बेटिंग रॅकेटमध्ये काही खेळाडू व चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींनी प्रमोशन तर केलेच, पण प्रमोशनच्या बदल्यात बेटिंग अॅपने या व्यक्तींना एंडोर्समेंट फी दिली. या एंडोर्समेंट फीद्वारे खरेदी केलेल्या मालमत्तेचा समावेश मनी लॉड्रिंग कायद्यातील "proceeds of crime" म्हणजेच 'गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्न' यात होतो. त्यामुळे या सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नेमके कुठल्या सेलिब्रिटींची आणि किती मालमत्ता जप्त केली जाणार याबाबत अद्याप तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही.
कोणकोणत्या सेलिब्रिटींचा समावेश?
दरम्यान, ED ने यापूर्वीही अशा प्रकारच्या ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग प्रकरणांमध्ये मोठी कारवाई केली होती. केंद्र सरकारने सायबर क्राईम, काळा पैसा साठवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग या गोष्टींना आळा घालण्यासाठी अशा अँप्सवर आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेट्सवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात युवराज, रैना, उथप्पा, शिखर धवन या क्रिकेटपटूंव्यतिरिक्त अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री मिमी चक्रवर्ती, अंकुश हाजरा, उर्वशी रौतेला अशी बडी नावे समाविष्ट असल्याने या तपासाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
Web Title: ED Enforcement Directorate to attach assets of some cricketers actors in online betting case yuvraj singh robin uthappa suresh raina shikhar dhawan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.