मुंबई - भारतात क्रिकेटर नेहमीच चर्चेत असतात. चांगली कामगिरी करणारे खेळाडू करोडपती तर होतातच शिवाय ते लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहचतात. मात्र, भारतातील एक अंध क्रिकेटर आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक जिंकले आहेत. मात्र, तो आज बेरोजगार असून नोकरी शोधतो आहे. या खेळाडूचे नाव शेखर नायक असे असून त्याला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. शेखर भारतासाठी 13 वर्ष क्रिकेट खेळला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने बेंगलोर आणि केपटाऊनमध्ये (दक्षिण आफ्रिका) झालेले विश्वचषक जिंकले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय संघाला दोन वेळा जेतेपद मिळवून देणारा हा दिग्गज खेळाडू आज बेरोजगार आहे. भारतासाठी त्यानं तब्बल 13 वर्ष क्रिकेट खेळला आहे. कर्नाटकच्या शिमोगामध्ये शेखर यांचा जन्म झाला. जन्मापासूनच शेखर यांना अंधतत्व होतं. शेखर यांनी शारदा देवी स्कूल फॉर ब्लाइंड मध्ये पहिल्यांदा क्रिकेट खेळला. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय संघात निवड झाली. 2002 पासून 2015 पर्यंत तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता. पाच वर्ष शेखर यांनी संघाचे कर्णधारपद संभाळलं. 2010 पासून 2015 पर्यंत त्यांनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा संभाळली.
शेखर यांच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वविजेता झाला. बंगळरुमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकावर भारतानं नाव कोरलं. त्यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेला विश्वचषकावरही भारतीय संघानं नाव कोरलं होतं. वयाच्या 30 व्या वर्षीच त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला.