DSP Mohammed Siraj: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या चर्चेत आला आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सिराजने आपल्या भेदग माऱ्याने इंग्लिश टीमला सळो की पळो करुन सोडले. भारताने शेवटचा सामना जिंकुन इंग्लंडविरुद्ध मालिका बरोबरीत आणली. इंग्लंडमधील दमदार कामगिरीनंतर मोहम्मद सिराज ट्रेंडिंगमध्ये आला आहे. न्यूज मीडियासह सोशल मीडियावरही सिराजची चर्चा सुरू आहे.
हैदराबादचा रहिवासी असलेल्या सिराजला काही काळापूर्वीच तेलंगणा सरकारने पोलिस उपअधीक्षक (DSP) पद बहाल केले होते. क्रिकेटच्या मैदानावर भारताला गौरव मिळवून देणाऱ्या सिराजला त्याच्या कामगिरीमुळे हा सन्मान देण्यात आला. तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, बीसीसीआयकडून तर सिराजला पैसे मिळतातच, पण सरकारी नोकरीत त्याला किती पगार मिळतो?
तेलंगणापोलिसात DSP पदाचा पगार किती आहे?
सध्या मोहम्मद सिराजला डीएसपी म्हणून मासिक ५८,८५० रुपये ते १,३७,०५० रुपये पगार मिळतो. याशिवाय घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर भत्ते देखील मिळतात. हा पगार ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत दिला जात आहे, ज्यामध्ये फिटमेंट फॅक्टर २.५७ ठेवण्यात आला होता.
८ व्या वेतन आयोगासह पगार किती वाढेल?
आता जर ८ वा वेतन आयोग लागू झाला, तर सिराजसारख्या डीएसपी अधिकाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते. त्याचा किमान पगार ८०,००० च्या वर जाऊ शकतो आणि कमाल पगार १.८५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो.
मोहम्मद सिराजचा प्रवासहैदराबादच्या रस्त्यांवर खेळणाऱ्या सिराजचा टीम इंडियापर्यंत पोहोचण्याचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्याचे वडील ऑटो चालवायचे आणि त्याची आई एक सामान्य गृहिणी होती. आर्थिक समस्या असूनही, सिराजने हार मानली नाही आणि कठोर परिश्रम करून आज तो या पदावर पोहोचला आहे.