Join us
Daily Top 2Weekly Top 5

द्रविड होता प्रशिक्षकपदाचा मुख्य दावेदार, तत्कालीन सीओए प्रमुख विनोद राय यांचा खुलासा

त्यावेळी राहुलचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होते. आमचे त्याच्याशी बोलणेही झाले, मात्र त्यावेळी राहुलने आपल्याला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे हे कारण सांगत ही आॅफर नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 05:08 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘राहुल द्रविड हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी २०१७ मध्ये मुख्य दावेदार होता’, असा खुलासा तत्कालीन क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी केला. ते एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.‘त्यावेळी राहुलचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होते. आमचे त्याच्याशी बोलणेही झाले, मात्र त्यावेळी राहुलने आपल्याला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे हे कारण सांगत ही आॅफर नाकारली’, असे विनोद राय म्हणाले. राहुल म्हणाला, ‘माझ्या घरात दोन मुले आहेत. सध्या मला त्यांच्यासोबत आणि कुटुंबीयांसोबत राहणे गरजेचे वाटते. गेली अनेक वर्षे मी संघासोबत जगभर फिरत होतो, त्यावेळी मला कुटुंबीयांना वेळ देणे जमले नाही.’ राहुलचे मत पटल्यानंतर बीसीसीआयने मुलाखती घेण्याचे ठरवल्याचे राय यांनी सांगितले.विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने विजेतेपद पटकावले. यादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या.भारतीय संघाच्या पराभवानंतर अनिल कुंबळे यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकपदासाठी शोध सुरू केला. सर्व प्रक्रियेनंतर प्रशिक्षकपदाची माळ रवी शास्त्रींच्या गळ्यातपडली. (वृत्तसंस्था)वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी आणि रवी शास्त्री या तिघांमध्ये झालेल्या शर्यतीत दोन वर्षे टीम इंडियाचे मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या शास्त्रींना झुकते माप देण्यात आले. सुरुवातीला शास्त्रीदेखील या पदासाठी उत्सुक नव्हते. परंतु विराटने केलेल्या विनंतीनंतर, बीसीसीआयच्या अर्जासाठीची तारीख वाढवली आणि शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरला. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर, शास्त्रींचा करार संपला होता. यानंतर बीसीसीआयने २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत शास्त्रींना करारात मुदतवाढ दिली आहे.

टॅग्स :राहूल द्रविडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय