जळगाव : पत्नीशी सुखाचा संसार सुरू असतानाच डॉक्टरने पत्नीच्या मैत्रिणीशी सूत जुळविले. तिच्याशी दुसऱ्या संसाराची स्वप्ने रंगविली, मात्र अशातच तिचे लग्न ठरले. काही दिवसांत साखरपुडा होणार त्याआधी डॉक्टरने बायकोच्या मैत्रिणीला पळवून श्रीरामपूरमध्ये निवासाची व्यवस्था केली. शंका येऊ नये म्हणून आपला नियमित व्यवसाय सुरू केला. दुसरीकडे लग्न ठरलेले असताना मुलगी गायब झाल्याने आई, वडील चिंतेत होते. डॉक्टर त्यांना मुलीचा काही शोध लागला का? पोलीस तपास करताहेत की नाही, अशी विचारणा करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी डॉक्टरचा खरा चेहरा उघड केला. पळविलेल्या तरुणीला श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले.
शेंदुर्णीतील महाविद्यालयात बीएस्सीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सीमा व ज्योती (काल्पनिक नाव) या मैत्रिणींपैकी ज्योतीचे शेंदुर्णी येथील डॉक्टरशी लग्न झाले. मैत्रीचे संबंध घनिष्ट असल्याने एका मैत्रिणीचे दुसऱ्या मैत्रिणीकडे येणे-जाणे होते. अशातच या डॉक्टरने बायकोच्या मैत्रिणीशी मैत्री वाढविली, त्याचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमप्रकरण चार वर्ष चालले. यंदा सीमाचे लग्न ठरले. काही दिवसांतच साखरपुडा होणार होता. त्याआधीच डॉक्टरने २९ ऑक्टोबरला दुपारी सीमाला पाचोरा येथे नेले. तेथून श्रीरामपूर येथे ओळखीच्या घरी पाठविले. तेथे काही दिवस थांबायला सांगितले होते.
संशय येऊ नये म्हणून डॉक्टरने गोंदिया येथून एकाच व्यक्तीच्या नावावर दोन सीम घेतले. त्यावरून दोघांचे एकमेकांशी बोलणे होत होते. पोलिसांनी तांत्रिक माहितीचा वापर करून सीमा श्रीरामपूरला असल्याचे निष्पन्न केले.