India vs Pakistan, Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ज्या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, तो म्हणजे भारत-पाकिस्तान सामना. अ गटात २३ फेब्रुवारीला भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. दुबईच्या स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार असून यासाठी तिकीटविक्रीला सुरुवातदेखील झाली आहे. भारताविरूद्धचा सामना असेल तेव्हा पाकिस्तानी आजी-माजी क्रिकेटपटू काहीना काही विधाने करतच असतात. त्याचप्रमाणे यावेळीही पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान याने पाकिस्तानी संघाला एक सल्ला दिला आहे.
"हल्ली भारत-पाकिस्तान सामन्यात मी जे पाहतो त्याने मला आश्चर्य वाटते. भारतीय खेळाडू फलंदाजीसाठी क्रीजवर येतात आणि पाकिस्तानी खेळाडू त्यांची बॅट घेतात, त्यांच्या पाठीवर थाप मारतात, त्यांच्याशी गप्पा मारत बसतात. आजकालच्या पाकिस्तानी खेळाडूंचं मैदानावर असं वागणं मला अजिबात पटत नाही. मैदानाबाहेरदेखील तुम्ही काही मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि मैदानावरही तुम्हाला तुमच्या मर्यादा माहिती असायला हव्यात," असे तो म्हणाला.
"मी संघात खेळत असताना माझे सिनियर खेळाडू मला सांगायचे की भारताविरूद्ध खेळताना खेळावर लक्ष द्या. मैदानात सामना सुरु असताना त्यांच्याशी अजिबात बोलू नका. तुम्ही जेव्हा त्यांच्याशी मैत्रीच्या नात्याने गप्पा मारायला जाता तेव्हा ते तुम्हाला कमकुवत समजतात. आपल्या खेळाडूंना समजत नाही पण त्यांच्या अशा वागण्याने ते कमकुवत वाटतात आणि मग त्याचा परिणाम खेळावर होऊन पाकिस्तानवरचा दबाव वाढतो," असे मोईन खान म्हणाला.