Join us

वेगळंच रसायन! राहुल द्रविडने बक्षिसाच्या रकमेतील अडीच कोटी रुपये नाकारले, नम्रपणाने मन जिंकले  

Rahul Dravid News: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघ आणि प्रशिक्षक वर्गाला मोठ्या रकमेची बक्षीसं जाहीर केली आहेत. मात्र राहुल द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणून मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 14:08 IST

Open in App

नुकत्याच आटोपलेल्या आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावले होते. भारतीय संघाच्या कामगिरीमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोलाची भूमिका बजावली होती. एक फलंदाज म्हणून भारतीय संघाला अनेक सामन्यात यश मिळवून देणाऱ्या राहुल द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणूनही आपल्या कौशल्याची छाप पाडली. मात्र प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा यशापयश पचवणाऱ्या राहुल द्रविड यांचे पाय जमिनीवरच राहिले. त्याचाच प्रत्यय आता भारतीय संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर येत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळाल्यानंतर बीसीसीआयनेभारतीय क्रिकेट संघ आणि प्रशिक्षक वर्गाला मोठ्या रकमेची बक्षीसं जाहीर केली आहेत. मात्र राहुल द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणून मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार दिला आहे.

बीसीसीआयने टी-२० विश्वचषक विजेत्या संघाला १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. ही रक्कम खेळाडू आणि कोचिंग स्टाफमधील ४२ सदस्यांमध्ये वाटलं जाणार होतं. १२५ कोटी रुपयांमधून संघातील सर्व १५ सदस्य आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळतील. तर कोचिंग स्टाफमधील इतर सदस्यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये मिळणार आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये राहुल द्रविड यांच्यासोबत सपोर्ट स्टाफमध्ये विक्रम राठोड, पारस म्हाम्ब्रे आणि टी. दिलीप यांचा समावेश होता.

दरम्यान, राहुल द्रविड यांनी विश्वविजयासाठी मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार दिला आहे. आपल्याला इतर कोचिंग स्टाफला मिळणाऱ्या रकमेएवढीच रक्कम देण्यात यावी अशी मागणी राहुल द्रविड यांनी केली आहे. याचाच अर्थ राहुल द्रविड त्यांना मिळणाऱ्या ५ कोटी रुपये बक्षीसाच्या रकमेपैकी २.५  कोटी रुपयांवर पाणी सोडण्यास तयार आहेत. ते कोचिंग स्टाफमधील इतर सदस्यांप्रमाणेच २.५ कोटी रुपयेच घेतील.

२९ जून रोजी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारताने विश्वचषकावर नाव कोलं होतं. त्याआधी २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला फायनलमध्ये नमवून विजेतेपद पटकावलं होतं.  

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय