कोलकाता: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत रविवारी तिसऱ्याच दिवशी ३० धावांनी पराभव होताच भारतीय संघावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. खेळपट्टीवरून वाद उद्भवला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यात मतभिन्नता असल्याचे जाणवले. फलंदाज-गोलंदाजांना आदर्श अशा खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी नांगी का टाकली, हा खरा प्रश्न आहे. महिनाभराआधी अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेआधी गिल म्हणाला होता की, आम्ही टर्निंग नव्हे तर चांगल्या खेळपट्टीवर खेळू इच्छितो.
फलंदाज-गोलंदाजांना पूरक असलेल्या स्पोर्टिंग खेळपट्टीवर खेळायला आवडेल. त्यानंतरही द. आफ्रिकेविरुद्ध भारत या वक्तव्याला छेद देणाऱ्या खेळपट्टीवर का खेळला? काल पराभवानंतर गंभीर यांनी मात्र आम्हाला अपेक्षित अशीच खेळपट्टी होती, असे वक्तव्य करीत संभ्रम निर्माण केला. ते पुढे म्हणाले, 'फलंदाज चांगला खेळ करीत नसतील, तर असे चित्र निर्माण होणारच ! विकेट खराब नव्हतीच, आम्ही जिंकलो असतो तर खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित झाले नसते.'
भारतीय संघ कोलकातामध्ये दाखल झाल्यापासून खेळाडूंचा फोकस खेळपट्टीवर होता. क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यासोबत त्यांनी सतत चर्चा केली. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर एक आठवडाआधीपासून पाणी टाकण्यात आले नव्हते. त्यावर कव्हर टाकण्यात आले होते. खेळपट्टी पूर्णपणे शुष्क असल्याने पहिल्या दिवशी पहिल्या सत्रापासून त्यावर भेगा पडल्या होत्या.
या खेळपट्टीवर ३८ फलंदाज बाद झाले. त्यात २२ बळी फिरकीपटूंनी, तर १६ बळी वेगवान गोलंदाजांनी बाद केले.भारताने आपल्या खेळपट्ट्यांवर मागच्या सहापैकी पाच सामने गमावले आहेत.गंभीर यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारताने १८ पैकी ८ सामने 3 जिंकले. त्यात बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या तुलनेत कमकुवत संघांविरुद्धच्या विजयांचा समावेश आहे.
गिल रुग्णालयाबाहेर
मानेच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला कर्णधार शुभमन गिलला हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली असली तरी दुसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. 'ईडन'वर गिल दुसऱ्या डावात मैदानात उतरला नव्हता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे अपडेट 'बीसीसीआय'ने दिले होते. सोमवारी त्याला सुटी मिळाली. २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत गिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.