WPL 2025 Auction Explained : सौदीतील जेद्दाह शहरात पार पडलेल्या IPL मेगा लिलावानंतर आता महिला प्रिमियर लीगच्या मिनी लिलावाची (WPL Mini Auction ) चर्चा रंगली आहे. १५ डिसेंबरला ५ फ्रँचायझी संघ महिला खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेच्या रिंगणात उतरतील. महिला क्रिकेटमधील आयपीएल अर्थात WPL च्या मिनी लिलावासाठी देश-विदेशातील १२० महिला खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे.
९१ भारतीय महिला खेळाडूंमध्ये फक्त ९ कॅप्ड खेळाडूंचा समावेश
मिनी लिलावाआधी सर्वच फ्रँचायझी संघांनी आपल्या संघातील मुख्य महिला खेळाडूंना रिटेन केले. WPL लिलावात ९१ भारतीय खेळाडूंचा समावेश असून यात फक्त ९ कॅप्ड (राष्ट्रीय संघातून खेळलेले खेळाडू) खेळाडूंचा सामावेश आहे. उर्वरित ३१ परदेशी खेळाडूंच्या गटातून ८ अनकॅप्ड खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे.
१९ पैकी कोणत्या संघात किती जागा? MI ला फक्त एका परदेशी खेळाडूवर लावता येईल बोली
बंगळुरुमध्ये होणाऱ्या लिलावाच्या माध्यमातून १९ महिला खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. यात ५ परदेशी महिला खेळाडूंचा समावेश असेल. गुजरात जाएंट्सचा संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक ४.४ कोटी इतकी रक्कम आहे. याउलट दिल्ली कॅपिटल्स महिला संघाच्या पर्समध्ये सर्वात कमी २.५ कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. या रक्कमेतून या संघाला एकूण ५ स्लॉट भरायचे आहेत. यात एका परदेशी खेळाडूचा ते समावेश करु शकतील. गुजरात जाएंट्स ४ पैकी २ भारतीय आणि २ परदेशी खेळाडूंवर बोली लावू शकतो. मुंबई इंडियन्सचा संघ ४ पैकी एका परदेशी खेळाडूवर डाव खेळू शकतो. आरसीबीच्या संघातील ४ स्लॉट हे भारतीय खेळाडूंसाठी आहेत. यूपी वॉरियर्ज ३ खेळाडूंपैकी एका परदेशी खेळाडूवर बोली लावू शकेल.
कोणत्या महिला खेळाडूवर लागणार मोठी बोली?
बंगळुरुमध्ये १५ डिसेंबरला दुपारी ३ वाजल्यापासून लिलाव प्रक्रियेला सुरुवात होईल. कॅरेबियन महिला क्रिकेटर डिआंड्रा डॉटिन, इंग्लंडची हेदर नाइट आणि दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली या स्टार परदेशी महिला खेळाडूंनी ५० लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली आहे. याशिवाय भारतीय संघातील खेळाडू स्नेह राणा, पूनम आणि मानसी जोशी या खेळाडूंवर अनेक फ्रँचायझीच्या नजरा असतील. यात कुणाला सर्वाधिक भाव मिळणार ते पाहण्याजोगे असेल.