India vs Pakistan ICC Champions Trophy Head To Head Record : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) आगामी चॅपियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनाचा आराखडा जाहीर केला आहे. भारतीय संघ या स्पर्धेत 'अ' गटात असून याच गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगालदेश या संघाचा समावेश आहे. 'ब' गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेकांसोबत भिडणार आहेत.
पाक विरुद्ध आठ वर्षांपूर्वीचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल टीम इंडिया
या स्पर्धेचे यजनानपद हे पाकिस्तानला मिळाले असून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाण्यास तयार नसल्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने हायब्रिड मॉडेलनुसार, दुबईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. ९ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत आयसीसीची ही प्रतिष्ठित स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सामन्याची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. भारत-पाक यांच्यातील राजकीय तणावामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय मालिकेला ब्रेक लागला आहे. आयसीसी किंवा आशिया कप स्पर्धेतच हे दोन संघ एकमेकांना भिडताना दिसते. २३ फेब्रुवारीला भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे. यावेळी भारतीय संघ ८ वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल. २०१७ च्या हंगामातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. या विजयाची टिमकी ते सातत्याने वाजवतानाही पाहायला मिळाले आहे.
भारत की पाकिस्तान? आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुणाचा राहिलाय दबदबा?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या स्पर्धेत भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्धच्या लढतीनं आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. पण सर्वांना उत्सुकता लागून असेल ती भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगणाऱ्या लढतीची. २३ फेब्रुवारीला दुबईच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. त्याआधी इथं आपण एक नजर टाकुयात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाक हे दोन संघ किती वेळा समोरासमोर आले आहेत त्यासंदर्भातील माहिती आणि दोन्ही संघातील या स्पर्धेतील रेकॉर्ड्सवर
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील रेकॉर्ड
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाक यांच्यात आतापर्यंत ५ लढती झाल्या आहेत. यात ३ सामने हे पाकिस्तानच्या संघाने जिंकले आहेत. दुसरीकडे भारतीय संघाने दोन वेळा बाजी मारली आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत पाक यांच्यातील पहिली लढत २००४ मध्ये झाली होती. हा सामना पाकिस्तानच्या संघानं ३ विकेट्स राखून जिंकला होता. त्यानंतर २००९ मध्ये पाकिस्तानच्या संघाने टीम इंडियाला ५४ धावांनी पराभूत केले. २०१३ मध्ये भारतीय संघाने पलटवार केला. ८ विकेट्सनी सामना जिंकत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने पाक विरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली. २०१७ मध्ये रंगलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील लढतीत भारतीय संघाने पाकला १२४ धावांनी पराभूत केले होते. पण याच हंगामातील फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाला १८० धावांनी मात देत ३-२ अशी आघाडी घेतली. भारतीय संघ यंदाच्या हंगामात या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.
Web Title: Did You Know About India vs Pakistan ICC Champions Trophy Head To Head Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.