मुंबई : तुफान फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया रविवारी भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने उतरेल. त्याचवेळी सध्या लंकेला रडकुंडीला आणणारा कर्णधार रोहित शर्मा घरच्या मैदानावर कोणता पराक्रम करणार, याचीच उत्सुकता भारतीयांना लागली आहे. दुसरीकडे, मालिकेतील उरलीसुरली प्रतिष्ठा जपण्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत खेळेल.
कटक आणि इंदूर येथे सलग दोन टी-२० सामने जिंकून भारताने आधीच तीन सामन्यांच्या मालिकेत २-० असा कब्जा केला आहे. त्यामुळे मालिकेतील अखेरचा सामना जिंकून लंकेला क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने टीम इंडियाने खेळेल. भारतीय संघ यासाठी लंकेला कोणतीही दयामाया दाखवणार नसल्याचे स्पष्ट असले, तरी त्यांची मुख्य मदार कर्णधार रोहित शर्मावर असेल. मोहाली येथे झालेल्या दुसºया एकदिवसीय सामन्यात जबरदस्त द्विशतक ठोकलेल्या रोहितने दुसºया टी-२० सामन्यातही वेगवान शतकी तडाखा देत लंकेला अक्षरश: रडकुंडीला आणले. त्यांच्या कोणत्याच गोलंदाजाचा रोहितपुढे निभाव लागला नाही. त्यातच, गेल्या सामन्यात रोहितसह लोकेश राहुलनेही आपला झंझावात सादर करताना लंकेची आगीतून फुफाट्यात आल्यासारखी अवस्था केली होती.
शिवाय, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या असे एकाहून एक हिटर असलेल्या भारताच्या मजबूत फलंदाजीला रोखण्याचे मुख्य आव्हान श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे असेल. शिवाय, वानखेडेची खेळपट्टी मोठ्या धावसंख्येसाठी ओळखली जात असली, तरी येथे अनेकदा गोलंदाजांचेही वर्चस्व पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे, या वेळी जर लंकेच्या गोलंदाजांनी नियंत्रित व अचूक मारा करण्यात यश मिळवले, तर त्यांना भारतीयांना मर्यादित धावसंख्येत रोखता येऊ शकते; परंतु पुन्हा एकदा रोहित-राहुल जोडी बहरली, तर मात्र लंकेला धावांच्या तडाख्यातून कोणीही वाचवू शकणार नाही. त्याचप्रमाणे कर्णधार म्हणून पहिला क्लीन स्वीप नोंदवण्याची सुवर्णसंधी मिळाली असल्याने रोहित शर्मा मुंबईत मजबूत संघ उतरवताना कोणतीही ढिलाई सोडणार नाही, हे निश्चित. गोलंदाजीमध्येही भारतासाठी फारशी अडचण नसेल. कुलदीप यादव-युझवेंद्र चहल यांनी लंकेच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवण्यात मोठे यश मिळवले आहे. या दोघांच्या फिरकीचा सामना करताना लंका फलंदाज अडखळताना दिसले. चहलने दोन्ही टी-२० सामन्यांत प्रत्येकी ४ बळी घेत एकूण ८ बळींसह आपला दरारा निर्माण केला आहे. कुलदीप आणि हार्दिक पांड्या यांनीही अनुक्रमे ५ व ४ बळी घेत चहलला चांगली साथ दिली आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला मुंबईतील अखेरचा सामना जिंकून आपली उरली सुरली प्रतिष्ठा जपायची आहे; शिवाय या विजयासह भारत दौºयाची विजयी सांगता करण्यासही त्यांचा प्रयत्न असेल; परंतु भारतीयांचा विशेष करून रोहितचा सुरू असलेला धडाका पाहता त्यांच्यासाठी खडतर आव्हान असेल.
संभाव्य संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), बसील थम्पी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, महेंद्रसिंह धोनी, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, जयदेव उनाडकट आणि वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), दुष्मंता चमीरा, अकिला धनंजय, चतुरंगा डिसिल्व्हा, निरोशन डिकवेला, नुवान प्रदीप, विश्वा फर्नांडो, असेला गुणरत्ने, दानुष्का गुणतिलका, अँजेलो मॅथ्यूज, सचिथ पथिराणा, कुशल परेरा, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका आणि उपुल थरंगा.
सामना : सायंकाळी ७ वा. स्थळ : वानखेडे स्टेडियम