Join us

रोहितच्या शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे आव्हान उभे करण्यात भारताला अपयश

रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाच्या जोरावर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारतीय संघाला मोठी मजल गाठता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 20:32 IST

Open in App

पोर्ट एलिझाबेथ -  सूर गवसलेल्या रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाच्या जोरावर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारतीय संघाला मोठी मजल गाठता आली नाही. दक्षिण आप्रिकेकडून एन्डिगीने ४ बळी घेत भारताच्या डावाला हादरे दिले. 

मालिकेत पिछाडीवर पडलेल्या दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, रबाडाने धवनची विकेट काढत भारताला पहिला धक्का दिला. धवनने २३ चेंडूत ३४ धावा तडकावल्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला. बऱ्याच दिवसांनी फॉर्ममध्ये परतलेल्या रोहितने आज दमदार खेळाचे प्रदर्शन केले. रोहित आणि विराटने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत भारताला दीडशेपार पोहोचवले. मात्र याच वेळी रोहितच्या चुकीमुळे विराट कोहली (३६) धावचीत झाला. त्यानंतर रोहितने धाव घेताना पुन्हा एकदा चूक केल्याने अजिंक्य रहाणेला माघारी परतावे लागले.

मात्र रोहितने एक बाजू लावून धरत आपले शतक पूर्ण केले. रोहितचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे सतरावे शतक ठरले. यादरम्यान, रोहितने श्रेयस अय्यरसोबत ६० धावांची भागीदारी रचली.  पण एन्डिगीने  रोहित शर्मा (११५), हार्दिक पांड्या (०) आणि श्रेयस अय्यरला (३०) झटपट बाद करत भारताला अडचणीत आणले. अखेर महेंद्रसिंग धोनी (१३) आणि भुवनेश्वर कुमार ( नाबाद १९) यांच्या सावध खेळाच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ७ बाद २७४ धावा कुटल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एन्डिगीने चार आणि रबाडाने एक गडी बाद केला. भारताचे दोन फलंदाज धावबाद झाले. 

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८भारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा