ir="ltr">Deepak Chahar, Mumbai Indians CSK : आगामी आयपीएलसाठी झालेल्या IPL Auction 2025 मध्ये
मुंबई इंडियन्सचा संघ एका अनुभवी वेगवान गोलंदाजाच्या शोधात होता. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासह तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मुंबईने
दीपक चहरवर बोली लावली.
दीपक चहर हा महेंद्रसिंह धोनीचा जुना भिडू असल्याने मुंबईसह CSK ने देखील बोली लावायला सुरुवात केली. अवघ्या २ कोटींच्या मूळ किमतीवरून बोली वाढत गेली. ८-९ कोटींच्या बोलीपर्यंत
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झुंज दिसली. त्यानंतर CSK ने माघार घेतली. त्यानंतर अचानक पंजाब किंग्जने बोलीत उडी घेतली. पण त्यांना फार पुढे जाता आले नाही. अखेर ९ कोटी २५ लाखांच्या मोठ्या बोलीवर मुंबई इंडियन्सने दीपक चहरला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पण दीपक चहरला CSK कडून खेळायचं होतं, त्यामुळे मुंबईने खरेदी केल्यामुळे तो नाराज आहे का अशा चर्चा रंगल्या आहेत. याबाबत त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली.
“महेंद्रसिंग धोनीने मला सुरुवातीपासून भरपूर सहकार्य केले, पाठिंबा दिला. त्यामुळे मला CSK संघातून खेळायची इच्छा होती, पण लिलावात माझं नाव दुसऱ्या दिवशी बोलीसाठी पुकारलं गेलं. त्यामुळे मला कल्पना होती की CSK संघ मला त्यांच्या ताफ्यात घेणं कठीण आहे. त्यांच्याकडे १३ कोटींचीच रक्कम शिल्लक होती, त्यातही माझ्यासाठी त्यांनी ९ कोटींपर्यंत बोली लावली. अखेर मुंबई इंडियन्सने मला त्यांच्या ताफ्यात बसले,” अशा शब्दांत दीपक चहरने आपल्या भावना स्पष्ट केल्या.
“जेव्हा मला समजले की माझे नाव दुसऱ्या दिवशीच्या लिलावात पुकारले जाणार आहे, तेव्हाच मला कल्पना होती की चेन्नई सुपर किंग्ज मला विकत घेऊ शकणार नाही. गेल्या वेळच्या लिलावात माझे नाव सुरुवातीच्या लॉटमध्ये होते, त्यामुळे CSK ने मला सहज बोली लावून विकत घेतले. यावेळी त्यांना ते शक्य झाले नाही,” असेही तो म्हणाला.
दरम्यान, दुखापतीमुळे दीपक चहर गेल्या काही कालावधीपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत खेळल्याने त्याला पुन्हा एकदा टीम इंडियात खेळण्याची संधी मिळू शकते असे अनेकांचे मत आहे. गेल्या काही वर्षात दीपक चहर दुखापतीमुळे त्रस्त आहे. २०२२ साली त्याला संपूर्ण IPL बाहेर बसावे लागले. तर त्याने २०२३ च्या हंगामात १० आणि २०२४च्या हंगामात केवळ ८ सामने खेळले. सध्या मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याचा फायदा त्याला नक्कीच झाला.
Web Title: Deepak Chahar Honest Take On CSK Failure To Buy Him In IPL Auction 2025 whose signed by Mumbai Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.