ब्रिसबन : चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात एका वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) दमदार कामगिरी करून हे दोघेही राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशात दाखल झाले. त्यांच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला बळ मिळाले आहे आणि वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. वॉर्नर व स्मिथ यांच्या समावेशाने ऑस्ट्रेलियाचा संघ संतुलित वाटत असला तरी सलामीच्या जागेवरून संघात दोन प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे. सलामीसाठी वॉर्नरचं नाणं खणखणीत असलं तरी त्यानं हे स्थान गमावल्याचे पाहायला मिळाले.
वर्ल्ड कप साठीचा ऑस्ट्रेलियाच संघ - अॅरोन फिंच, जेसन बेहरेनडोर्फ, अॅलेक्स करी, नॅथन कोल्टर नायल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.