Join us

वात्रट-वाया गेलेला मिश्किल पोरगा डेव्हिड वॉर्नर, चुकला-हरला पण थांबला नाही!

चुकण्याची मुभा आणि संधी स्वत:ला देत राहणारा वॉर्नर, ‘महान’पणाचं ओझं न वाहता आता त्याच्या तीन लहानग्या मुलींसोबत नवीन इनिंग सुरु करतोय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 15:53 IST

Open in App

- अनन्या भारद्वाज, मुक्त पत्रकार

डेव्हिड वॉर्नर, दोस्तों का दोस्त! तो नेहमी म्हणतो, यू आर अलाऊड टू फेल!! आता त्यानं निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेटमध्ये त्याचं योगदान मोठं आहे.

दुसऱ्या दिवशी वन डे मॅच असताना सगळ्यांचा डोळा चुकवून दांडी मारुन कोण गायब होतं? डेव्हिड वॉर्नर!क्रिकेट सभ्य माणसांचा खेळ असला तरी डेव्हिड वॉर्नरचे ‘उद्योग’ कधी सभ्य नव्हतेच. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच तो मैदानात जितका ‘मारकुटा’ तितकाच बाहेरही उपद्रवी. मॅच चुकवून गायब झाला, चौकशी झाली तर त्यानं खरंखरं उत्तर दिलं मी घोड्यांची शर्यत पहायला गेलो होतो. एक मॅचपुरता सस्पेंड झाला, पण सुधारला नाहीच. पुढे बॉल टॅम्परिंग प्रकरण झाले आणि त्याच्यावर १२ महिन्यांची बंदी आली. सगळे म्हणाले वॉर्नर संपला, ‘म्हातारा’ झाला. ओल्ड मॅन म्हणत त्याची टिंगल झाली. आयपीएलमध्ये तर सनरायझर हैद्राबादने त्याचा पुरेपूर अपमान करत त्याला पाणी आणायला बाहेरही बसवले होते. तोही सगळ्यांना नडत होता, प्रतिस्पर्धी खेळाडूला बुक्का मारणे ते पत्रकारांना वाट्टेल ते बोलणे हे सगळं त्यानं केलं.

मात्र यासगळ्यात त्याचा क्रिकेटवरचा फोकस चुकून कधी हलला नाही. तो पुन्हा पुन्हा कमबॅक करत राहिला. वॉर्नर संपला अशा हाळ्या उठल्या की त्याच्या बॅटमधून धावा सैरावैरा पळू लागायच्या. दिवस बरे असो की वाईट त्याच्या चेहऱ्यावरचं हसू काही हललं नाही, कॉलेजात हुशार पण वात्रट पोरगा जसा हसतो तसा तो हसत राहायचा. आणि कुणी विचारलाच सल्ला तर बिंधास्त सांगायचा, फारतर काय होतं बॉलर असाल तर बॅटर तुम्हाला उचलून फेकतो एखादी ओव्हर, कधीकधी तर संपूर्ण मॅचमध्ये मार बसतो. बॅटर असाल तर भोपळ्यावर बोल्ड होता. याहून वाईट काय होतं? माणसं आहोत ना आपण? चुकतो, पुन्हा उभं राहतो, शिकतो, पुन्हा फटके खातो, अपयशी व्हायचा हक्कच आहे आपल्याला! कोहलीचा बॅड पॅच असताना त्यानं त्यालाही सांगितलं होतं, यू आर अलाऊड टू फेल!

सतत यशस्वी होण्याचा ताण खेळातला आनंदच संपून टाकतो असं म्हणणाऱ्या वॉर्नरने नुकतीच  क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

चुकण्याची मुभा आणि संधी स्वत:ला देत राहणारा वॉर्नर, ‘महान’पणाचं ओझं न वाहता आता त्याच्या तीन लहानग्या मुलींसोबत नवीन इनिंग सुरु करतोय.. 

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलिया