Rohit Sharma says 'we are four' in heartwarming post Goes Viral : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या घरी सध्या आनंदी आनंद गडे...असेच वातावरण आहे. कारण रोहित शर्मा आणि रितिका ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा आई बाबा झालीये. १५ नोव्हेंबरला रोहितची पत्नी रितिकानं दुसऱ्या अपत्याच्या रुपात बेबी बॉयला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टीचा गाजावाजा झाल्यानंतर आता रोहित शर्मानं इन्स्टाग्राम अकाउंटवरुन खास पोस्ट शेअर केली आहे. कुटुंबियात चौथ्या सदस्याचं आगमन झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रोहित शर्मानं एक खास फोटो शेअर केल्याचे दिसते. ही पोस्ट आता चर्चेत आलीये.
खास फोटो अन् त्यातील लक्षवेधी कॅप्शन
रोहितनं इंस्टाग्राम अकाऊंटवरुन जी पोस्ट शेअर केलीये त्यात त्याने प्रतिकात्मक फोटोचा वापर केला आहे. आमचं कुटुंब आता चार जणांच झालंय, असा उल्लेख यात करण्यात आला आहे. पोस्टमध्ये रोहित, रितिका, समायरा किंवा नव्या पाहुण्याची झलक दिसत नसली तरी बाबा झाल्याचा रोहित शर्माचा आनंद आणि त्याच्या मनातील खास भावना या फोटोत दडल्याच्या दिसून येईल. रोहित शर्मानं ही पोस्ट शेअर करताना रितिकालाही टॅग केले आहे. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात होताना दिसत आहे. तासाभरात १० लाखांहून अधिक चाहत्यांनी त्याची पोस्ट लाइक केल्याचे दिसते.
रोहित पर्थच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार?
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार असल्यामुळे तो संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेला नाही. २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी तो संघात असेल की नाही, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.