Rohit Sharma wife Ritika Sajdeh buys new flat in Mumbai: भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सजदेह पुन्हा एकदा त्यांच्या नवीन मालमत्तेमुळे चर्चेत आले आहेत. रितीका सजदेह हिने मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या प्रभादेवी (Prabhadevi) परिसरात २६.३० कोटी रुपयांचे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. गुरुवारी (८ जानेवारी २०२६) समोर आलेल्या अधिकृत दस्तऐवजांनुसार या व्यवहाराची माहिती उघड झाली आहे.
घराची वैशिष्ट्ये आणि किंमत
हे नवीन अपार्टमेंट प्रभादेवी येथील प्रसिद्ध 'आहूजा टॉवर्स' (Ahuja Towers) मध्ये आहे. या घराचे एकूण क्षेत्रफळ (Carpet Area) २,७६०.४० चौरस फूट इतके आहे. या घरासोबत रितीकाला एकूण तीन कार पार्किंगच्या जागाही मिळाल्या आहेत. या व्यवहारासाठी रितीकाने १.३१ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. हा व्यवहार डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाला असून त्याची अधिकृत नोंदणी आता झाली आहे.
कुणाकडून खरेदी केले घर?
प्रॉपर्टी नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, रितीकाने हे अपार्टमेंट अजिंक्य डी.वाय.पाटील आणि पूजा अजिंक्य पाटील यांच्याकडून खरेदी केले आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्माचे सध्याचे निवासस्थान देखील याच आहूजा टॉवर्समध्ये २९ व्या मजल्यावर आहे, ज्याची किंमत साधारण ३० कोटी रुपये आहे. आता त्याच इमारतीत त्यांनी आणखी एका घराची गुंतवणूक केली आहे.
प्रभादेवीला परिसराला सेलिब्रिटींची पसंती
प्रभादेवी हा मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित परिसरांपैकी एक मानला जातो. वांद्रे-वरळी सी-लिंक आणि महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे हा परिसर कॉर्पोरेट, नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींची पहिली पसंती आहे. रोहित शर्माने गेल्या काही काळात आपल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीत मोठी वाढ केली असून, त्याने लोअर परेल येथील आपले एक घर नुकतेच २.६ लाख रुपये महिना भाड्याने दिले आहे.
रितिकाचा व्यवसाय काय?
रितीका सजदेह ही स्वतः एक यशस्वी स्पोर्ट्स मॅनेजर असून तिने कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचे काम पाहिले आहे. आता या नवीन घराच्या खरेदीमुळे तेंडुलकर, कोहली यांच्यानंतर रोहित शर्माचे कुटुंबही रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे.