माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा एका ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्याला २२ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. या प्रकरणी समन्स बजावण्यात आलेला उथप्पा हा तिसरा माजी क्रिकेटपटू आहे. याआधी ईडीने सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी केली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, उथप्पाने बेकायदेशीर बेटिंग ॲपच्या जाहिरातीसाठी स्वतःच्या प्रतिमेचा वापर केला होता का, आणि त्या बदल्यात त्याला पैसे मिळाले होते का, याची तपासणी केली जात आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही चौकशी सुरू आहे. ईडीला या नेटवर्कमध्ये त्याची आर्थिक किंवा इतर कोणतीही भूमिका आहे का, हे जाणून घ्यायचे आहे.
सध्या आशिया चषक २०२५ मध्ये समालोचक म्हणून काम करत असलेल्या उथप्पाला आता ईडीच्या चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. या घटनेमुळे ऑनलाइन बेटिंगच्या व्यसनाधीनतेचा आणि सेलिब्रिटींच्या सहभागाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ज्या बेटिंग ॲपची चौकशी सुरू आहे, त्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याचा आरोप आहे. हे ॲप ७० भाषांमध्ये उपलब्ध असून, हजारो क्रीडा स्पर्धांवर पैज लावण्याची सुविधा देते. विविध सेलिब्रिटींना समन्स पाठवून, ईडी या ॲप्सशी त्यांचे संबंध आणि त्यांना मिळालेल्या मानधनाविषयी माहिती घेत आहे.
Web Title: Cricketer Robin Uthappa summoned on September 22 by ED in money-laundering case
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.