वडोदरा (गुजरात): भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेची रणधुमाळी सुरू असतानाच, क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बडोद्याचे दिग्गज खेळाडू जेकब मार्टिन यांना वडोदरा पोलिसांनी अटक केली आहे. 'ड्रंक अँड ड्राईव्ह' केसमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, नशेच्या अवस्थेत मार्टिन यांनी आपल्या कारने तीन वाहनांना जोरदार धडक दिली.
५३ वर्षीय जेकब मार्टिन हे आपली कार घेऊन अकोटा दांडिया बाजार ब्रिजवरून जात होते. यावेळी ते पूर्णपणे मद्याच्या नशेत होते. नशेमुळे त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि त्यांनी समोरून येणाऱ्या दोन ते तीन वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर पुलावर मोठी खळबळ उडाली आणि वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच अकोटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत जेकब मार्टिन हे मद्याच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना अटक केली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे, मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 'किंग'
जेकब मार्टिन हे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत मोठे नाव आहे. १९९९ ते २००१ दरम्यान त्यांनी भारतासाठी १० एकदिवसीय सामने खेळले आहेत. १३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी २३ शतके आणि ४७ अर्धशतकांच्या मदतीने ९,१९२ धावा केल्या आहेत. त्यांचा सर्वोच्च स्कोअर २७१ धावा असा आहे. निवृत्तीनंतर ते प्रशिक्षक म्हणून सक्रिय असून बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-१९ टीमचे कोच म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.