Join us

वर्चस्व गाजवण्यास प्रतिबद्ध होतो - कमिन्स

या मालिकेत पुजाराच्या गरजेपेक्षा अधिक बचावात्मक पवित्र्यावर टीका होत आहे. या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना पुजाराने १७६ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची संथ खेळी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 03:06 IST

Open in App

सिडनी : मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वीपासून भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी परिस्थिती शक्य तेवढी कठिण करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध होतो, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केली. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी शानदार कामगिरी केल्यानंतर तो बोलत होता.

या मालिकेत पुजाराच्या गरजेपेक्षा अधिक बचावात्मक पवित्र्यावर टीका होत आहे. या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना पुजाराने १७६ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची संथ खेळी केली, त्यामुळे भारतीय संघाने लय गमावली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना कमिन्स म्हणाला, ‘आज (शनिवार) मला खेळपट्टीकडून थोडी मदत मिळाली; पण पुजारासारख्या खेळाडूला अधिक गोलंदाजी करावी लागते, याची कल्पना आहे.’ सोटी मानांकनामध्ये अव्वल स्थानी असलेल्या या गोलंदाजाने पुजाराला तंबूत परतविताना केवळ २९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. सुरू असलेल्या मालिकेत पुजारा पाचव्या डावात चौथ्यांदा कमिन्सचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात पुजाराने शानदार फलंदाजी केली होती; पण या मालिकेत मात्र तो सहज भासला नाही.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ३३८ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात भारताचा डाव केवळ २४४ धावांत संपुष्टात आला. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद १०३ धावा करीत आपली आघाडी १९७ धावांची केली आहे. आमचा संघ चांगल्या स्थितीत आहे, पण भारत पुनरागमन करू शकतो, असेही कमिन्स म्हणाला. हा २७ वर्षीय गोलंदाज म्हणाला, ‘दिवसाची सुरुवात झाली त्यावेळी आम्ही विचार केला होता की, आम्हाला दिवसाचा शेवट गोलंदाजी करीतच करावा लागला. जवळजवळ २०० धावांची आघाडी व ८ विकेट शिल्लक असल्यामुळे आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. भारत चांगला संघ असून ते पुनरागमन करतील, असा विश्वास वाटतो.’

‘या मालिकेसाठी आम्ही योजना आखली होती. त्यात पुजाराला धावा करण्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडणे हा महत्त्वाचा भाग होता. तो २०० चेंडू खेळो किंवा ३०० चेंडू खेळो; पण आम्ही चांगला मारा करीत त्याच्यापुढे आव्हान निर्माण करणार आहोत. नशिबाने आतापर्यंत ही योजना यशस्वी ठरली आहे.’-कमिन्स

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया