Join us

Cheteshwar Pujara, Team India: "त्यावेळीच मला 'टीम इंडिया'त कमबॅक करण्याचा विश्वास होता"; चेतेश्वर पुजाराने व्यक्त केल्या भावना

पाहा कसोटी संघात आणखी कोणाला मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:45 IST

Open in App

Cheteshwar Pujara, Team India: भारतीय संघाचा ज्येष्ठ कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याचे आगामी कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमन झाले. ३४ वर्षीय चेतेश्वर पुजाराला १७ खेळाडूंच्या संघात संधी देण्यात आली. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यातील एक कसोटी शिल्लक असून ती या वर्षी खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी जाहीर केलेल्या संघात पुजाराला स्थान देण्यात आले. आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरी नंतर त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. पण इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेत त्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याचे संघात पुनरागमन झाले.

श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत त्याला संधी देण्यात आली नव्हती. पण नुकत्याच झालेल्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत त्याने ससेक्स संघाकडून खेळताना पाच सामन्यात ७२० धावा केल्या आणि आपली दावेदारी भक्कम केली. संघात पुन्हा एकदा संधी मिळाल्यानंतर पुजारा म्हणाला, "इंग्लंडमधील कसोटीसाठी माझी संघात निवड झाल्याचा मला आनंद आहे. माझी कौंटी क्रिकेटमधील कामगिरी पाहून मला संधी दिल्याबद्दल मी खुश आहे. कौंटी क्रिकेट खेळताना मला विश्वास होता की याचा मला क्रिकेट सुधारण्यासाठी उपयोग होईल आणि संघात कमबॅक करण्यासाठी उपयोग होईल."

"आता संघात निवड झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सरावाला सुरूवात करणार आहे. माझं संपूर्ण लक्ष संघातील माझ्या निवडीला न्याय देण्याकडे आहे. संघात स्थान मिळाल्याने मी कसून सराव करेन आणि माझा खेळ अधिकाधिक कसा बहरेल याकडे लक्ष देईन.", असेही पुजारा म्हणाला.

दरम्यान, IPL नंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे इंग्लंड दौऱ्यावरील पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती आणि ती कसोटी यंदा होणार आहे. भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाला इतिहास घडवण्याची संधी आहे.

भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडचेतेश्वर पुजाराभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ
Open in App