चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या विक्रमी विजयाची स्क्रिप्ट लिहिणाऱ्या मोहऱ्यांमध्ये श्रेयस अय्यर आघाडीवर राहिला. टीम इंडियाला चॅम्पियन्स केल्यावर आता तो आगामी आयपीएलमध्ये पंजाबला पहिली वहिली ट्रॉफी जिंकून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लीगला सुरुवात होण्याआधी श्रेयस अय्यरची एक मुलाखत चर्चेत आहे. ज्यात त्याने अनेक विषयावर भाष्य करताना कोलकाता नाईट रायडर्सनं गत हंगामातील कामगिरीकडे कानाडोळा केल्याची खंतही व्यक्त केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला नारळ
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर श्रेयस अय्यरनं टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिलीये. या मुलाखतीत त्याने गत हंगामात कोलकाता संघाला चॅम्पियन केलं, पण त्या फ्रँचायझीकडून सन्मान काही मिळाला नाही, अशी गोष्ट बोलून दाखवली. संघाला जेतेपद मिळवून दिल्यावर ज्या गोष्टीचा हक्कदार होतो ते मिळालेच नाही, असे म्हणत त्याने शाहरुखच्या मालकीच्या संघानं रिटेन न केल्याची गोष्ट मनाला लागल्याचेच बोलून दाखवलंय. गत हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघानं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. पण मेगा लिलावाआधी रिटेन रिलीजच्या खेळात श्रेयस अय्यला या फ्रँचायझी संघानं नारळ दिला. शाहरुखच्या मालकीच्या संघानं त्याला कायम न करता व्यंकटेश अय्यरवर खेळलेला मोठा डाव अनेकांना समजण्यापलिकडचा होता. ही गोष्ट आता अय्यरनंही बोलून दाखवलीये.
शाहरुखनं दुखावलं, मग प्रितीनं दिला भाव थेट कॅप्टन केलं ना राव...
शाहरुखच्या संघानं श्रेयस अय्यरला संघाबाहेरचा रस्ता दाखवल्यावर मेगा लिलावात प्रिती झिंटाच्या मालकीच्या पंजाब किंग्स संघाने या गड्यावर विक्रमी बोली लावल्याचे पाहायला मिळाले. तब्बल २६.७५ कोटी खर्च करत पंजाबच्या संघानं श्रेयस अय्यरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. रिषभ पंत पाठोपाठ तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. एवढेच नाही तर मोठी बोली लावल्यावर पंजाबच्या संघानं त्याच्यावर कॅप्टन्सीची जबाबदारीही दिलीये. तो नेतृत्वातील कर्तृत्व सिद्ध करत या संघाला पहिली वहिली ट्रॉफी जिंकून देणार का? ते पाहण्याजोगे असेल.
आयपीएल आधी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा गाजवली
श्रेयस अय्यर याच्याकडे फक्त कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझी संघानेच दुर्लक्ष केलेले नाही. बीसीसीआयनेही या गड्याचे नाव वार्षिक करारातून गायब केले होते. कोणतीही तक्रार न करता त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळला अन् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रुबाबही दाखवला. यंदाच्या आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. एकंदरीत विचार करता मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रचिन रवींद्र (२६३ धावा) याच्यानंतर श्रेयस अय्यर दुसऱ्या स्थानावर राहिला. ५ सामन्यातील ५ डावात त्याने २४३ धावा काढल्या. त्याची ही कामगिरी प्रितीनं खेळेला मोठा डाव एकदम परफेक्ट आहे, याचे संकेत देणाराच आहे.