चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 'ब' गटात सेमी फायनल गाठण्यासाठी रंगतदार परिस्थिती निर्माण झालीये. अफगाणिस्तानच्या संघानं इंग्लंडला पराभूत करत त्यांचा यंदाच्या हंगामातील खेळ खल्लास केलाय. आता या गटात अफगाणिस्तानसह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सेमीत धडक मारण्याची संधी आहे. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील १० वा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाऊस पडला अन् सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय?
हा सामना अफगाणिस्तानसाठी 'करो वा मरो'ची लढत असेल. दुसरीकडे पराभवानंतरही ऑस्ट्रेलियन संघाच्या आशा पल्लवित राहतील. पण यासाठी त्यांना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीवर अवलंबून रहावे लागेल. या जर तरच्या समीकरणात पावसानं घोळ घातला तर काय? असाही एक प्रश्न निर्माण होतो. यामागचं कारण 'ब' गटात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हे दोन सामने पावसामुळे रद्द झाल्याचे पाहायला मिळाले आहे. इथं जाणून घेऊयात 'ब' गटातील संघासाठी कसे असेल सेमीच समीकरण? या गटातील साखळी फेरीतील उर्वरीत दोन सामन्यात पाऊस पडला अन् सामना रद्द करण्याची वेळ आली तर त्याचा कुणाला होईल फायदा अन् कोण जाईल घाट्यात यासंदर्भातील माहिती
सेमीच्या वाटेत पावसाच्या अडथळ्याची शक्यता किती?
'ब' गटातील साखळी फेरीतील उर्वरित लढतीत कोण जिंकणार? यापेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दोन्ही सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे का? जर पावसामुळे सामना रद्दच करण्याची वेळ आली तर काय? होईल ते समजून घेऊयात. सेमीच्या शर्यतीत असलेला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना लाहोरच्या मैदानात रंगणार आहे. सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ७० टक्के आहे. जर पावसामुळे हा सामना रद्द करण्याची वेळ आली तर याचा अफगाणिस्तानच्या संघाला मोठा फटका बसेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेचा संघही सेफ झोनमध्ये जाईल.
पावसामुळे सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाला मिळेल सेमीच तिकीट
अफगाणिस्तानच्या खात्यात २ सामन्यातील एका विजयासह २ गुण जमा आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात एक विजय आणि एक अनिर्णित राहिल्या सामन्यासह ३ गुण जमा आहेत. जर लाहोरच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यात पाऊस पडला अन् सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण मिळेल. या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ४ गुण जमा होतील. दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ ३ गुणांवरच राहिल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे सेमीतील तिकीट पक्के होईल. तर अफगाणिस्तानच्या संघाला ३ गुणांसह दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून रहावे लागेल.
अफगाणिस्तानने सामना जिंकला तरी ऑस्ट्रेलियाला असेल सेमीची संधी
अफगाणिस्तानच्या संघानं लाहोरचं मैदान मारलं तरी ऑस्ट्रेलियाला सेमीची संधी असेल. यासाठी त्यांना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत केले तरच त्यांना सेमीत एन्ट्री मिळू शकते. आता या सामन्यातही पावसाने घोळ घातला तर मात्र ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. कारण ४ गुणांसह दक्षिण आफ्रिका सेमीत जाईल. थोडक्यात सेमीच्या शर्यतीतून चार पैकी इंग्लंडच्या रुपात या गटातून एक संघ बाद झाला असला तरी पावसामुळे सेमीची शर्यत अधिक रंगतदार झाल्याचे पाहायला मिळत आहे.