आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील कळीच्या मुद्द्यावर आता तोडगा निघाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून BCCI च्या मागणीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अखेर 'हायब्रिड मॉडेल' प्रस्ताव 'कबुल' केलाय. पीसीबीच्या या भुमिकेमुळे आता कसं भारत म्हणेल तसं हा सीन निर्माण झाला आहे. २०२५ मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद टिकवून ठेवण्यासाठी BCCI ला हवा असणारा स्विकारताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ICC समोर दोन अटीही ठेवल्या आहेत. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बदलले सूर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानला मिळाले आहे. पाकिस्तानने या स्पर्धेची तयारीही केली. पण भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. भारतीय क्रिकेट नियमामक मंडळाच्या या भूमिकेनंतर हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला. पण सुरुवातीपासूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं हा प्रस्ताव मान्य होणार नाही, अशी भूमिका घेतली. पण अखेर त्यांनी आयसीसीने दिलेला शेवटचा पर्याय मान्य केला आहे.
पीटीआयने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, मोहसीन नक्वी यांनी भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव मान्य करताना त्यांनी दोन अटीही आयसीसीसमोर ठेवल्या आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं काय ठेवलीये अट?
- 'हायब्रिड मॉडेल'च्या प्रस्तावानुसार, भारतीय संघाचे सर्व सामने आणि सेमी फायनल, फायनल लढत ही दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पाकिस्तानला मान्य आहे. पण जर भारतीय संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या सेमी किंवा फायनलपर्यंत पोहचला नाही तर या लढती लाहोरमध्ये घेण्याची परवानगी मिळावी, अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पहिली अट आहे.
- याशिवाय आयसीसीने यापुढे समान निवाडा करावा, असे म्हणत २०३१ पर्यंत हाच फॉर्म्युला कायम ठेवावा, अशीही अट PCB नं घातली आहे. याचा अर्थ भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेतही हायब्रिड मॉडेलच्या अंतर्गत पाकिस्तानचे सामने भारताबाहेर खेळवण्याची तयारी आयसीसीने दाखवावी, असे त्यांनी म्हटले आहे.
आता या अटी आयसीसी मान्य करणार का? तो एक वेगळा विषय ठरेल. पण तुर्तास आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भातील मुद्द्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जो हट्ट धरला होता तो सोडला आहे, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. त्यामुळे लवकरच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित होईल, असे दिसते.