Join us

केवळ हॅट्रिकच नाही, अक्षर पटेलनं बरंच काही गमावलं; रोहित शर्माचं एक झेल सोडणं एवढं महागात पडलं!

हा झेल सुटल्यानंतर, रोहित शर्माही अत्यंत निराश दिसून आला होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 21:26 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली. जर अक्षर हॅटट्रिक घेण्यात यशस्वी झाला असता तर त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले असेत. बांगलादेशच्या डावाच्या नवव्या षटकात अक्षर पटेलला गोलंदाजीवर आणण्यात आले. त्याने षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर तन्जीद हसन आणि नंतर मुशफिकुर रहीम यांना बाद केले. यानंतर, अक्षर हॅटट्रिक करेल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र असे होऊ शकले नाही. कारण, स्लिपवर उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा झाकीर अलीच्या बॅटला लागून आलेला झेल घेऊ शकला नाही. हा झेल सुटल्यानंतर, रोहित शर्माही अत्यंत निराश दिसून आला होता. 

जर अक्षर पटेल येथे हॅटट्रिक घेण्यात यशस्वी ठरला असता, तर त्याच्या नावे अनेक विक्रम नोंदवले गेले असते. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत पदार्पणातच, अशी कामगिरी करणारा अक्षर पहिलाच फिरकीपटू ठरला असता. महत्वाचे म्हणजे, तो पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी इव्हेंटमध्ये खेळत होता. याशिवाय, तो आयसीसी स्पर्धेत हॅटट्रिक मिळवणारा पहिला भारतीय फिरकीपटूही ठरला असता. आतापर्यंत एकाही भारतीय फिरकीपटूला आयसीसी स्पर्धेत हॅटट्रिक मिळवता आलेली नाही.

याशिवाय, एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम करणारा कुलदीप यादव हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. जर अक्षरने हॅटट्रिक पूर्ण केली असती, तर तो अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला असता. कुलदीप यादवने आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय सामन्यात हॅट्रिक घेतली आहे. २०१७ मध्ये त्याने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेतली. तेव्हा त्याने मॅथ्यू वेड, अ‍ॅश्टन अगर आणि पॅट कमिन्स यांना बाद केले होते. यानंतर, २०१९ मध्ये, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना शाई होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांना बाद केले होते. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत केवळ एकच हॅटट्रिक -चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास पाहता, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच हॅटट्रिक झाली आहे. २००६ मध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने अशी कामगिरी केली होती. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला होता. तेव्हा जेरोमने मायकेल हसी, ब्रेट ली आणि ब्रॅड हॉग यांना बाद केले होते.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५अक्षर पटेलरोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेश