इंग्लंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील प्रत्येक सामन्यात भारतीय संघानं काही प्रयोग केले. या मालिकेसाठी संघात असणाऱ्या प्रत्येकाला किमान एक मॅच खेळण्याची संधी मिळाली. पण रिषभ पंत हा एकमेवर असा खेळाडू होता ज्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी भारतीय मैदानात जे घडलं तेच चित्र पंतसंदर्भात दुबईत पाहायला मिळणार याचे संकेत इंग्लड विरुद्धच्या मालिकेतून मिळाले आहेत. त्यात गौतम गंभीरच्या वक्तव्याने टीम इंडिया लोकेश राहुलला खेळवण्याच्या निर्णायावर खंबीर असल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विकेट किपर बॅटर कोण? टीम इंडियानं अगदी पक्क ठरवलं की,...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी भारतीय संघानं इंग्लंड विरुद्ध जी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली त्यातील एखाद्या सामन्यात रिषभ पंतला आजमावून भारतीय संघाला मोठ्या स्पर्धेआधी आणखी एका विकेट किपर बॅटरचा पर्याय चाचपण्याची संधी होती. पण भारतीय संघानं लोकेश राहुलला पहिली पसंती द्यायचे हे पक्के ठरवल्याचे दिसते. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं यासंदर्भातील भूमिका स्पष्ट देखील केली आहे.
गंभीरनं स्पष्ट केली भूमिका, केएल राहुलच पहिली पसंती
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी विकेट किपर बॅटरच्या रुपात पंतपेक्षा लोकेश राहुल प्राधान्य देणार असल्याची गोष्ट गौतम गंभीरन अगदी स्पष्टपणे बोलून दाखवलीये. इंग्लंड विरुद्धच्या मालिका विजयानंतर गंभीर म्हणाला की, सध्या मी एवढेच सांगू शकतो की, लोकेश राहुल विकेट किपर बॅटरच्या रुपात आमची पहिली पसंती आहे. रिषभ पंतला संधी मिळेल. पण सध्या लोकेश राहुल चांगली कामगिरी करतोय. आम्ही दोन विकेट किपर बॅटरसह मैदानात उतरू शकत नाही. असे गंभीरनं म्हटलंय. पंतला संधी मिळेल, असा उल्लेख गंभीरनं केला असला तरी त्याची शक्यता खूपच कमी वाटते.
पंतला बसावं लागणार बाकावर
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात लोकेश राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून आले. पण तिसऱ्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर आला अन् त्याने आपल्या भात्यातील तोरा दाखवून दिला. २९ चेंडूतील ४० धावांच्या खेळीसह त्याने टीम मॅनेजमेंटनं आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तयार आहे, हे दाखवून दिले आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियानं लेफ्ट राइट कॉम्बिनेशनसाठी अक्षर पटेलच्या रुपात पर्यायही शोधला आहे. त्यामुळे रिषभ पंतला दुबईच तिकीट मिळालं असलं तरी जे इथं घडलं तोच सीन त्याच्याबाबत तिथंही घडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तिथं जाऊन त्याला फक्त बाकावर बसून केएल राहुलची बॅटिंगच बघायला लागेल.