Saqlain Mushtaq Challenges Team India : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघानं दुबईच्या मैदानात पाकिस्तानचा बुक्का पाडला. या पराभवासह यजमानपद असूनही पाकिस्तानला स्पर्धेबाहेर जाण्याचा जोरदार धक्काही बसला. एककाळ होता ज्यावेळी पाकिस्तानचा क्रिकेटमध्ये एक वेगळा दबदबा होता. पाकिस्तानी गोलंदाजी जगात भारी मानली जायची. पण मागील काही दिवसांत टीम इंडियानं त्यांची हवाच काढली आहे. भारतीय संघानं त्यांचा खुळखुळा केलाय, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लाज गेली तरी माज कायम!
आयसीसी स्पर्धेत नेहमीच भारतीय संघ पाकविरुद्ध भारी ठरला. पण गत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत (२०१७) फायनलमध्ये भारताला पराभूत केल्याच्या बात मारत पाकिस्तान आम्ही कमी नाही, असे सांगत राहिलाय. गत हंगामातील पराभवाची व्याजासह परतफेड करत टीम इंडियाने त्यांना आपली जागा दाखवलीये. पण लाज गेली तरी माज कायम असा काहीसा सीन पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटरच्या वक्तव्यामुळे निर्माण झालाय. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि फिरकीपटू सकलेन मुश्ताक याने भारतीय संघाला चॅलेंज दिले आहे. जाणून घेऊयात नेमकं तो काय म्हणालाय त्यासंदर्भातील स्टोरी
नेमकं काय म्हणाला सकलेन मुश्ताक?
सकलेन मुश्ताक याने एका कार्यक्रमात भारत-पाक यांच्यातील ताकद पाहायची असेल, तर तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रत्येकी १०-१० सामने खेळवायला पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, जर भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघ असेल तर त्यांनी पाकिस्तान विरुद्ध १० कसोटी, १० वनडे आणि १० टी-२० सामने खेळावे. मग कळेल ते किती भारी आहेत. न्यूज २४ वर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विश्लेषण करताना पाकच्या माजी क्रिकेटरनं केलेले हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर त्यावर चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते.
भारतीय संघ साखळी फेरीत बाद होईल, अशी मनात होती धारणा, पण...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानच्या संघावर चांगली नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धेआधी भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यावर खूप नखरे करून ते हायब्रिड मॉडेलसाठी तयार झाले. भारताच्या मॅचेस दुबईमध्ये खेळवणं निश्चित झाल्यावर जर भारत साखळी फेरीतच बाद झाला तर दोन्ही सेमीफायनलसह फायनल पाकिस्तामध्ये खेळवावी, अशी अटही त्यांनी हायब्रिड मॉडेलसाठी राजी होताना घातली होती. पण बिचाऱ्यांवर आता यजमानपद असताना साखळी फेरीत बाद होण्याची नामुष्की ओढावली. दुसरीकडे भारतीय संघ दुबईत फायनल खेळण्याच्या मूडमध्ये दिसतोय.