Join us

IND vs NZ : अय्यरच्या फिफ्टीनंतर अखेरच्या षटकात पांड्याची फटकेबाजी; किवींसमोर २५० धावांचं टार्गेट

आघाडीच्या फंलदाजांनी नांगी टाकल्यावर श्रेयस अय्यरनं दिलासा देणारी खेळी करताना ९८ चेंडूत ७९ धावांची खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:15 IST

Open in App

मॅट हेन्रीचा भेदक मारा, ग्लेन फिलिप्स आणि केन विलियम्सन यांनी पेश केलेला फिल्डिंगचा जबरदस्त नजारा याच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं भारतीय संघाला निर्धारित ५० षटकात ९ बाद २४९ धावांत रोखले आहे. आघाडीच्या फंलदाजांनी नांगी टाकल्यावर श्रेयस अय्यरनं दिलासा देणारी खेळी करताना ९८ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. याशिवाय अक्षर पटेलनं ४२ धावांच्या खेळी आणि हार्दिक पांड्यानं अखेरच्या षटकात ४५ चेंडूत  ४५ धावांचे योगदान दिले. भारतीय संघ फिरकीच्या जोरावर न्यूझीलंडला रोखून गटात अव्वलस्थान पटकवणार की, न्यूझीलंडचा संघ धावांचा पाठलाग करत नंबर वनचा डाव साधणार ते पाहण्याजोगे असेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी टाकली नांगी

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टॉस गमावल्यावर रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडीनं भारताच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या १५ धावा असताना शुबमन गिल ७ चेंडूत २ धावा करून तंबूत परतला. मॅट हेन्रीनं भारतीय संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर एक चौकार आणि एक षटकार मारून लयीत दिसणारा रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. जेमिसनच्या गोलंदाजीवर विल यंगनं त्याचा झेल टिपला. ग्लेन फिलिप्सनं अप्रतिम कॅचसह विराट कोहलीचा खेळ ११ धावांवर खल्लास केला. आघाडीच्या फळीतील तीन फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर टीम इंडिया अडचणीत सापडली होती.

अय्यर-अक्षर जोडीनं सावरला डाव, अखेरच्या षटकात पांड्याची फटकेबाजी

मग अय्यर आणि अक्षर पटेल जोडीनं संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची दमदार भागीदारी रचली. अक्षर पटेल ६१ चेंडूत ४२ धावा करून तंबूत परतला. केएल राहुल २९ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या आणि जड्डू जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण २० चेंडूत १६ धावा करून जडेजा माघारी फिरला. पांड्याने जोर लावला. पण तो शेवटपर्यंत टिकला नाही. त्याने अखेरच्या षटकात ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने भारतीय संघाच्या धावसंख्येत ४५ चेंड़ूत ४५ धावांची भर घातली. पांड्या अखेरच्या षटकात आउट झाला.

मॅट हेन्रीचा 'पंजा'; फिल्डिंगचा सर्वोत्तम नजारा 

मोहम्मद शमीच्या रुपात मॅट हेन्रीनं या सामन्यातील पाचवा बळी टिपला. त्याच्याशिवाय कायले जेमीसन, विल्यम विल ओ'रुर्के, मिचेल सँटनर आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी एक एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. हेन्रीच्या भेदक माऱ्याशिवाय न्यूझीलंडच्या संघानं सर्वोत्तम फिल्डिंगसह भारतीय संघाला कमी धावांत रोखण्यात यश मिळवल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल तर फक्त गोलंदाजीवर नाही तर फिल्डिंगलाही तोडीस तोड उत्तर द्यावे लागेल.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५श्रेयस अय्यरहार्दिक पांड्याअक्षर पटेल