Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध झाला. मात्र, अशा महत्वाच्या स्पर्धेत पाकिस्तानवर मोठी नामुष्टी ओढावली. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी आपल्याच देशाच्या सामन्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र कराची स्टेडियममध्ये पाहायला मिळाले. यावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकारवर बरीच टीका होत आहे. दरम्यान, आता 23 फेब्रुवारीला दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दुबईला जाण्यासाठी धावपळ
पाकिस्तानी आपल्या घरच्या मैदानावर सामना पाहण्यासाठी जात नसले तरी भारताविरुद्धचा सामना पाहण्यासाठी तिकीट आणि व्हिसासाठी स्पर्धा लागली आहे. 'डॉन'च्या वृत्तानुसार, पाकिस्तान आणि इतर देशांत राहणाऱ्या पाकिस्तानी लोकांना भारताविरुद्धचा सामना पाहण्यासाठी दुबईला जायचे आहे, परंतु त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सर्वप्रथम ऑनलाइन विक्री सुरू होताच या सामन्याची सर्व तिकिटे सुमारे तासाभरात विकली गेली. ज्यांना तिकीट मिळाले, ते भाग्यवान होते. पण आता यूएईचा व्हिसा मिळवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तिकिटे मिळाल्यानंतर क्रिकेट चाहते व्हिसासाठी अर्ज करत आहेत, पण त्यांना दुबईला जाण्यासाठी यूएईचा व्हिसा मिळू शकलेला नाही. काही चाहत्यांनी सांगितले की, त्यांनी सकाळी व्हिसासाठी अर्ज केला आणि संध्याकाळी अर्ज कोणतेही कारण न देता फेटाळण्यात आला.
व्हिसा अर्ज का नाकारले?
काही क्रिकेट चाहते होते ज्यांनी ऑनलाइन व्हिसा अर्ज रद्द केल्यानंतर ई-मेल आणि फोनद्वारे दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने निराशाच झाली. रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या विविध शहरांतील लोक UAE व्हिसासाठी अर्ज करत आहेत, पण वर्किंग व्हिसाच्या व्यतिरिक्त त्यांना टुरिस्ट व्हिसासाठी मान्यता मिळत नाहीये.
अहवालानुसार, यूएईच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच देशात येणाऱ्या पाकिस्तानींची तपासणी वाढवली आहे. याचे कारण म्हणजे, त्यांच्यावर गुन्हेगारी आणि भीक मागण्यासारख्या बेकायदेशीर कामात सहभागी असल्याचा आरोप आहे. UAE मध्ये येणाऱ्या सर्व पाकिस्तानी प्रवाशांची सखोल तपासणी आणि पडताळणी करण्याच्या सूचना सरकारने जारी केल्या आहेत. याबाबत ट्रॅव्हल एजंटांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानी युएईत भीक मागतात
पाकिस्तानमधून लोक संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये भीक मागण्यासाठी जात असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या. अशा देशांमध्ये गेल्यानंतर भीक मागण्याशिवाय तस्करी आणि इतर बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असल्याचा आरोप पाकिस्तानींवर होता. यानंतर या देशांनी गेल्या वर्षी हजारो पाकिस्तानी नागरिकांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकले. UAE ने देशात येणाऱ्या पाकिस्तानींना वर्किंग व्हिसा देण्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. पण टुरिस्ट व्हिसा मिळणे खूप अवघड झाले आहे. UAE सरकारला भीती आहे की, टुरिस्ट व्हिसावर आलेले पाकिस्तानी येथे येऊन भीक मागू शकतात, ज्यामुळे सरकारला खूप त्रास सहन करावा लागतो.