AFG vs AUS, SpencerJohnson Take Wicket Rahmanullah Gurbaz With A Brilliant Yorker : अफगाणिस्तानच्या संघानं लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सलामीवीर रहमानुल्ला गुरबाझ (Rahmanullah Gurbaz) नं पुन्हा घोळ घातला. मोठी खेळी खेळण्याची धमक असलेला हा सलामीवीर सातत्यपूर्ण अपयशी ठरताना दिसतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या साखळी फेरीतील लढतीला क्वार्टरफायनलचं स्वरुप आल्यावर त्याची बॅट तळपेल, अशी आशा होती. पण तो पुन्हा फोल ठरला. स्पेन्सर जॉन्सन (Spencer Johnson) याने परफेक्ट सेटअपसह अप्रतिम यॉर्कर लेंथ चेंडूवर त्याचा त्रिफळाचित केले. स्टायलिश अंदाजात च्युइंगम चघळत बॅटिंग करणाऱ्या गुरबाझला खातेही उघडता आले नाही. ५ चेंडूचा सामना केल्यावर तो शून्यावर बाद झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्याच षटकात पहिली विकेट, यॉर्करवर बोल्ड उडल्यावर बॅट्समनला कळायचं झालं बंद
पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय़ घेतल्यावर गुरबाझ आणि झाद्रान या जोडीनं अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाकडून स्पेन्सर जॉन्सन हा पहिले षटक घेऊन आला. पहिल्याच चेंडूवर अफगाणिस्तानच्या संघाला लेग बाइजच्या रुपात दोन धावा मिळाल्या. त्यानंतर स्पेन्सर जॉन्सन याने वाइडच्या रुपात आणखी एक अवांतर धावा दिली. मग शॉर्ट लेंथ चेंडू टाकून त्याने गुरबाझला बेसावध केले अन् सुरेख अप्रतिम यॉर्कर लेंथ टाकत त्याने अफगाणिस्तानच्या स्टार बॅटरला क्लीन बोल्ड केले. चेंडू कसा आला अन् कधी त्रिफळा उडला ते गुरबाझला कळलंही नाही. आउट झाल्यावर तो आवाक् झाला. च्युइंगम चघळत तो काहीवेळ तसाच उभा राहिला अन् मग तंबूत जाऊन बसला.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत एकाही सामन्यात दिसली नाही धमक
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही गुरबाझला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. या सामन्यात तो १४ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला होता. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यावेळीही गुरबाझच्या भात्यातून फक्त ६ धावाच आल्या. आता सेमीची संधी असताना त्याच्या पदरी भोपळा पडलाय. मागील १० डावात फक्त एका सामन्यात त्याच्या भात्यातून अर्धशतक आले आहे. आयर्लंड विरुद्धच्या वनडेत गुरबाझनं ५५ चेंडूत ५१ धावांची खेळी केली होती.