Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मिथ, वॉर्नर, बॅनक्रॉफ्ट... चेंडू कुरतडल्याची शिक्षा भोगलेले त्रिकूट 'अ‍ॅशेस'साठी ऑस्ट्रेलियन संघात

अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 17 सदस्यीय संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 17:41 IST

Open in App

लंडन : अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 17 सदस्यीय संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा संघ 2001 नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट हे चेंडू कुरतडल्या प्रकरणात शिक्षा पूर्ण करणारे त्रिकुट या मालिकेत पुन्हा ऑसी संघात एकत्र दिसणार आहेत. या संघात जलदगती गोलंदाज मिचेल नेसर यालाही संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या जलद माऱ्याची जबाबदारी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, जेम्स पॅटींसन, पीटर सिडल आणि अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श यांच्या खांद्यावर असणार आहे.  

मॅथ्यू वेड आणि मार्नस लॅबशचँग्ने यांनीही स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात स्थान पटकावले आहे. वेड हा टीम पेनला राखीव यष्टिरक्षक असणार आहे, तर लॅबशचँग्ने हा नॅथन लियॉनला फिरकीत मदत करणार आहे. या संघात अ‍ॅलेक्स केरी आणि जोन हॉलंड यांच्या नावाची उणीव जाणवत आहे. या दोघांना डावलून वेड व लॅबशचँग्नेचा समावेश करण्यात आला. दरम्यान, दुखापतग्रस्त उस्मान ख्वाजाला संघात कायम राखले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी त्याला दुखापत झाली होती.

 ''25 खेळाडूंमधून 17 जणांची निवड करणे, खूप आव्हानात्मक काम होते,'' असे निवड समिती प्रमुख ट्रॅव्हर होन्स यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''या मालिकेसाठी आम्ही जोरदार तयारी केली आहे. या संघातील आठ खेळाडू हे ऑस्ट्रेलिया A संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील सदस्य आहेत. वर्ल्ड कप संघातील सहा खेळाडूही या संघात आहेत आणि तीन खेळाडू हे कौंटी क्रिकेट खेळणारे आहेत. याचा अर्थ असा की सर्व खेळाडूंनी कसून तयारी केलेली आहे.'' 

2016नंतर पॅटीन्सन कसोटी संघात पुनरागमन करत आहे, तर पीटर सिडल इंग्लंडविरुद्ध सहावी कसोटी मालिका खेळणार आहे.  ऑसी संघः टीम पेन, कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, पॅट कमिन्स, मार्कस हॅरीस, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लँबशचँग्न, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, मिचेल नेसर, जेम्स पॅटीन्सन, पीटर सिडल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नरइंग्लंड