Prithvi Shaw Century In Debut For Maharashtra : देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईची साथ सोडून महाराष्ट्र संघाचा हात धरणाऱ्या पृथ्वी शॉनं करिअरची नवी आस निर्माण करणारी खेळी केलीये. बुची बाबू करंडक स्पर्धेतील महाराष्ट्र संघाकडून खेळताना पहिल्याच डावात त्याने शतकी खेळी केलीय आहे. छत्तीसगड विरुद्धच्या सामन्यात २५ वर्षीय सलामीवीरानं कडक बॅटिंगचा नजराणा पेश करताना १२२ चेंडूत शतक साजरे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं, पण ऋतुराजनं घोळ घातला; अन्...
छत्तीसगडच्या संघाचा डाव २५२ धावांवर आटोपल्यावर महारष्ट्र संघाकडून पृथ्वीनं दमदार खेळी केली. महाराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात करताना पहिल्या डावातील ४४ व्या षटकात पृथ्वी शॉनं तीन आकडी धावसंख्या गाठली. त्याची ही खेळी १४ चौकार आणि ६ षटकारांसह बहरलेली होती. दुसऱ्या बाजूला या संघातील आणखी एक स्टार ऋतुराज गायकवाड मात्र सपशेल अपयशी ठरला. संघाच्या धावसंख्येत फक्त एका धावेची भर घातली. तो स्वस्तात माघारी फिरल्यामुळे पृथ्वीच्या शतकानंतरही महाराष्ट्र संघ पिछाडीवर राहिला.
छत्तीसगड संघाने घेतली आघाडी
पृथ्वी शॉनं १४१ चेंडूत १११ धावांची खेळी केली. त्याच्या शिवाय सौरभ नवाळे याने १०१ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी साकारली. या दोघांच्या खेळीनंतर दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्र संघाचा पहिला डाव ७३ षटकात २१७ धावांवर आटोपला. छत्तीसगड संघाने पहिल्या डावात ७८ धावांची आघाडी घेतली आहे.
'टायगर अभी जिंदा है...' पण, हा फक्त ट्रेलर
पृथ्वी शॉनं आपल्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत टीम इंडियाकडून ५ कसोटी सामने, ६ वनडे आणि एक टी-२० सामना खेळला आहे. शतकी खेळीसह पदार्पण केल्यावर कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो टीम इंडियातून बाहेर फेकला गेला. IPL २०२५ च्या मेगा लिलावात पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर मुंबई संघातही त्याला संघाबाहेर होण्याची वेळ आली. कारकिर्दीत अडचणीत असताना त्याने मुंबईचा संघ सोडून महाराष्ट्र संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला अन् आता त्याच्या भात्यातून शतकी खेळी आली आहे. महाराष्ट्र संघाकडून पदार्पणातील त्याची ही खेळी "टायगर अभी जिंदा है...हा ट्रेलर दाखवणारी असली तरी पिक्चर अभी बाकी आहे. कारण सातत्य टिकवण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.