Rohit Sharma Virat Kohli Team India: कसोटी, टी२० मधून निवृत्त झालेले विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना मैदानावर पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. हे दोन्ही खेळाडू आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. भारताचा बांगलादेश दौरा १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया तेथे तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी२० मालिका खेळणार होती. या मालिकेत दोघे टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसतील अशी क्रिकेट चाहत्यांना आशा आहे. पण या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. ही बातमी वाचल्याने टीम इंडियाच्या चाहत्यांचा नक्कीच हिरमोड होऊ शकतो.
विराट, रोहितबद्दल महत्त्वाची अपडेट
मिळालेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा बांगलादेश दौरा रद्द होऊ शकतो. बांगलादेशातील राजकीय परिस्थिती सध्या तरी चांगली नाही. कदाचित म्हणूनच केंद्र सरकारने अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) या दौऱ्यासाठी परवानगी दिलेली नाही. येथील खेळाडूंच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
बांगलादेशमध्ये परिस्थिती बिकट
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार होता, पण आता या दौऱ्यावर संकटाचे ढग दाटू लागले आहेत. बांगलादेशमधील सत्ताबदलानंतर तेथील वातावरण खूपच बिघडले आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून केंद्र सरकार भारतीय संघाला बांगलादेश दौऱ्यावर जाऊ देणार नाही, असे मानले जात आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
दोन्ही बोर्ड मोठा निर्णय घेऊ शकतात
याशिवाय, BCCI आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) लवकरच आगामी मालिकेबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे, परंतु दोन्ही बोर्ड दौरा रद्द करण्याऐवजी काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यास सहमती दर्शवू शकतात. तसे झाल्यास, चाहत्यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेत खेळताना पाहायला मिळतील.