ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात गंभीर दुखापत झालेल्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. या दुखापतीनंतर त्याला सिडनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक महत्त्वाचे अपडेट जारी करत, अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती दिली आहे.
काय होती दुखापत?
ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलेक्स कॅरीचा झेल पकडताना अय्यरच्या बरगडीला जोरदार मार लागला होता. या दुखापतीमुळे त्याच्या स्पीनला जखम झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला. मैदानातून त्याला ड्रेसिंग रुममध्ये नेण्यात आले. परंतू तिथे तो बेशुद्ध पडल्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या वेळीच धोका लक्षात आला आणि त्याला स्थिती गंभीर स्थितीत तातडीने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दुखापतीचे निदान झाल्यानंतर अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी 'मायनर मेडिकल प्रोसिजर' करण्यात आली. या उपचारामुळे रक्तस्त्राव तात्काळ थांबवण्यात यश आले.
'प्रकृती स्थिर, रिकव्हरी वेगात'
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "श्रेयस अय्यरची प्रकृती आता स्थिर आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे बरा होत आहे. सिडनी आणि भारतातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने बीसीसीआयचे वैद्यकीय पथक अय्यरच्या प्रगतीवर समाधानी आहे आणि याच कारणामुळे त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे."
अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी तो पुढील काही दिवस सिडनीमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहे. त्याला विमान प्रवासासाठी वैद्यकीय दृष्ट्या 'फिट' ठरवल्यानंतरच तो भारतात परतणार आहे. या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आगामी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. तो मैदानात कधी परतणार, याबाबत अधिकृत माहिती नंतर जाहीर केली जाईल.