Team India Playing XI, Ind vs Eng 4th T20 : भारतीय क्रिकेट संघ सध्या आपल्या अनेक खेळाडूंच्या फिटनेसशी झुंजत आहे. जसप्रीत बुमराहपासून ते नितीश कुमार रेड्डीपर्यंत अनेक खेळाडू वेगवेगळ्या दुखापतींमुळे बाहेर आहेत. पण आता भारतीय संघाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू तंदुरुस्त असून खेळण्यासाठी तयार आहे. हा खेळाडू म्हणजे रिंकू सिंग (Rinku Singh). रिंकू इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात खेळण्यासाठी फिट आहे. सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन तेन्डेशकाटे यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
पहिल्या सामन्यानंतर दुखापत, आता फिट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी पुण्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने सलग २ दिवस सराव केला. सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत प्रशिक्षक रायन यांनी सांगितले की, बुधवारी रिंकूने फलंदाजी केली आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. त्यांनी पुढे सांगितले की आता तो शुक्रवारी होणाऱ्या मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.
रिंकूने या मालिकेतील पहिला सामना खेळला होता. पण दुसऱ्या सामन्यापूर्वी त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला होता. मात्र पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. कारण इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताने केवळ २ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले होते. तिसऱ्या टी२० मध्ये धावांचा पाठलाग करताना रिंकूची अनुपस्थिती जाणवली. अशा स्थितीत आता पुढच्या सामन्यात रिंकूला संधी मिळाल्यास त्याच्या कामगिरीवर लक्ष असेल.
प्लेइंग ११ मधून कोणाला काढणार?
जर प्लेइंग इलेव्हनचा विचार केला तर रिंकूला ध्रुव जुरेलच्या जागी संघात स्थान मिळू शकेल. रिंकू संघाबाहेर गेल्याने जुरेलला शेवटच्या दोन सामन्यात संधी मिळाली होती, पण तो प्रभाव पाडू शकला नाही. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात त्याने केवळ ४ धावा केल्या तर राजकोटमध्ये तो केवळ २ धावा करून बाद झाला. राजकोटमध्ये त्याला ८व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, त्यामुळे त्याच्याकडे जास्त वेळ नव्हता आणि या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण चेन्नईमधील सामन्यात त्याच्याकडे संधी असूनही त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. म्हणून आता रिंकूसाठी त्याला संघाबाहेर केले जाऊ शकते.