भारतीय संघाची रन मशीन विराट कोहली ( Virat Kohli, ICC ODI Rankings ) सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. कोहलीची शतकांची मालिका नवीन वर्षातही कायम आहे आणि त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये दोन दमदार शतके झळकावली आहेत. मागील चार सामन्यांमध्ये तीन वन डे शतकं झळकावणाऱ्या कोहलीने मंगळवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी कोहली  वन डेत आठव्या क्रमांकावर होता आणि आता तो टॉप तीन फलंदाजांमध्ये आला आहे. कोहलीने चार स्थानांनी झेप घेतली आणि आता तो चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमच्या ( Babar Azam) पायाखालची जमीन सरकली आहे. 
कोहलीने नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात ११३ धावा, दुसऱ्या सामन्यात ४ धावा आणि तिसऱ्या सामन्यात १६६ धावा केल्या. अशा प्रकारे कोहलीने तीन सामन्यांत २८३ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी कोहली ८व्या स्थानावर होता. मात्र आता तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. कोहलीचे ७५० रेटिंग गुण आहेत. कोहलीच्या पुढे क्विंटन डी कॉक (७५९ गुण) तिसऱ्या स्थानावर, रॅसी व्हॅन डर ड्युसेन (७६६ गुण) दुसऱ्या स्थानावर तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (८८७ गुण) पहिल्या स्थानावर आहे. 
विराट कोहली सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता तो लवकरच वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा करू शकतो. बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. कोहली आता न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत आपल्या फलंदाजीने पुन्हा शतक झळकावू इच्छित आहे. कोहलीचा फॉर्म कायम राहिला तर त्याला नंबर वन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.   
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"