जोहान्सबर्ग - एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवणाऱ्या भारतीय संघाने रविवारपासून सुरू झालेल्या टी-20 मालिकेतही विजयी घोडदौड कायम राखली आहे. फलंदाजांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीनंतर भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या 5 बळींच्या जोरावर पहिल्या टी-20 लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 28 धावांनी मात केली. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरुवातीलाच अडखळला. जेजे स्मट्स (14), जीन पॉल दुमिनी (3) आणि डेव्हिड मिलर (9) हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर मात्र रीझा हँड्रिक्स (70) आणि फरहान बेहारडिन (39) यांनी दमदार फलंदाजी करत सामन्यात रंगत आणली. पण भुवनेश्वरने एकाच षटकात हँर्डिक्स, क्लासेन (16) आणि मॉरिस (0) यांच्या विकेट काढत भारताचा विजय निश्चित केला. अखेर दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 175 धावांपर्यंतच मजल मारता आली.
तत्पूर्वी पहिल्या टी-20 लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 204 धावांचे आव्हान ठेवले होते . सलामीवीर शिखर धवनने केलेली आक्रमक अर्धशतकी खेळी आणि इतर फलंदाजांनी केलेल्या छोट्या पण उययुक्त खेळींच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 203 धावा फटकावल्या. मात्र शिखर धवच्या फटकेबाजीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांना वेगाने धावा जमवता न आल्याने भारतीय संघाला अजून मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला तडाखेबंद सुरुवात करून दिली. मात्र रोहित शर्मा झटपट 21 धावा काढून दालाची शिकार झाला. दीर्घकाळानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैनानेही सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मात्र तोही 15 धावा काढून माघारी परतला.
त्यानंतर धवन आणि विराट कोहलीने आफ्रिकेच्या गोलंदाजांना धुवून काढले. यादरम्यान, विराटला एक जिवदानही मिळाले. भारतीय संघाचे शतक नवव्या षटकातच फलकावर लागले. पण विराट कोहली (26) शम्सीची शिकार झाला आणि भारताच्या डावास ब्रेक लागला. विराटपाठोपाठ शिखर धवनही (72) बाद झाला. दोन खंदे फलंदाज माघारी परतल्यावर मनीष पांडेने सावध पवित्रा घेतला. अखेर मनीष पांडे ( नाबाद 29), महेंद्रसिंग धोनी (16) आणि हार्दिक पांड्या ( 13) यांनी भारताला दोनशेपार मजल मारून दिली.