Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत... 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही, असे गांगुलीला वाटते. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्स राखून पराभूत केलं, तर न्यूझीलंडनंही ८ विकेट्सनं विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 11:59 IST

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची झालेली कामगिरी लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न अजूनही क्रिकेट चाहते करत आहेत. पाकिस्तानकडून वर्ल्ड कप स्पर्धेत कधीही न हरलेल्या टीम इंडियाला यंदा लाजीरवणाऱ्या पराभावाचा सामना करावा लागला. त्यानंतर उपांत्य फेरीच्या आशांचा न्यूझीलंडनं चुराडा केला अन् भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा अखेरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असल्यानं आशाही उंचावल्या होत्या. पण, साऱ्यांचा स्वप्नभंग झाला. भारतीय संघाच्या कामगिरीवर आतापर्यंत एकही शब्द व्यक्त न झालेल्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं ( Sourav Ganguly) अखेर त्याचं परखड मत मांडलं.

“Backstage with Boria” या कार्यक्रमात पत्रकार बोरीया मझुमदार यांच्याशी गप्पा मारताना गांगुलीनं त्याचं मत व्यक्त केलं. ''प्रामाणिकपणे सांगायचं तर २०१७ व २०१९च्या आयसीसी स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आम्हाला अंतिम फेरीत हार मानावी लागली. तेव्हा मी समालोचक होतो. त्यानंतर २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत संघाची वाटचाल दमदार सुरू होती, परंतु एका वाईट दिवसानं दोन महिन्यांची मेहनत पाण्यात गेली. यावेळच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर मी निराश झालो. मागील ४-५ वर्षांतील भारतीय संघाची ही सर्वात खराब कामगिरी होती,''असे मत गांगुलीनं व्यक्त केलं.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही, असे गांगुलीला वाटते. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्स राखून पराभूत केलं, तर न्यूझीलंडनंही ८ विकेट्सनं विजय मिळवला. या दोन दारूण पराभवानंतर भारतीय संघाला मोठा धक्काच बसला. गांगुली म्हणाला,''मला यामागचं कारण माहित नाही, परंतु भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही. मोठ्या स्पर्धेत असं कधीकधी होतं, तुम्ही खूप दडपण घेता. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेचा १५% खेळ केला.''

आता पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे आणि बीसीसीआय अध्यक्ष गांगुली याला भारतीय संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे.   

टॅग्स :सौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App