Join us

India vs Bangladesh, 1st T20I : टीम इंडियाच्या पराभवानंतर सौरव गांगुलीनं केलं विधान, म्हणाला...

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:39 IST

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. भारताने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे लक्ष्य बांगलादेशनं ७ विकेट्स राखून सहज पार केले. मुश्फिकर रहीमच्या नाबाद ६० धावांनी बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथमच भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. 

या लढतीवर प्रदुषणाच्या समस्येचं सावट होतच.. पर्यावरण प्रेमींनी ही लढत रद्द करून दुसरीकडे खेळवावी अशी विनंती केली होती. पण, तरीही हा सामना खेळवण्यात आला आणि त्यात बांगलादेशनं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीनं एक विधान केलं. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १४८ धावा केल्या. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ९९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळण्याचा विक्रम रोहितने नावावर करताना महेंद्रसिंग धोनीचा (९८) विक्रम मोडला. रोहित (९) पहिल्याच षटकात माघारी परतला. तरीही ट्वेंटी-२० सर्वाधिक धावांचा विक्रम हिटमॅनने नावावर केला. त्याने विराट कोहलीला मागे टाकले. शिखर धवन ( ४१), श्रेयस अय्यर (२२) आणि रिषभ पंत (२७) यांनी चांगला खेळ केला. कृणाल पांड्या ( १५) आणि वॉशिंग्टन सुंदर (१४) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्या षटकात धक्का बसला. त्यानंतर मोहम्मद नइम (२६), सौम्या सरकार ( ३९) आणि मुश्फिकर रहीम (६०*) यांनी बांगलादेशचा विजय सूकर केला. ८ प्रयत्नानंतर बांगलादेशचा भारतीय संघावरील पहिलाच विजय ठरला. या सामन्यानंतर गांगुलीनं ट्विट केलं. त्यात त्यानं लिहिलं की,''अशा वातावरणातही सामना खेळल्याबद्दल दोन्ही संघांचे आभार. बांगलादेशची कामगिरी कौतुकास्पद झाली.''

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशसौरभ गांगुलीबीसीसीआय