BCCI New Rules for Team India, IND vs ENG T20 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या राष्ट्रीय संघात शिस्त आणि एकजूटतेला प्रोत्साहन देण्यासाठी दहा सूत्रीय नियमावली बनवली. यामध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक, दौऱ्यावर कुटुंबीय आणि वैयक्तिक स्टाफच्या उपस्थितीवर बंदी आणि मालिकेदरम्यान वैयक्तिक जाहिरातीवर बंदी यासारखे निर्देश दिले आहेत. टीम इंडियासाठी BCCI ने नुकतेच बनवलेले 10 पॉइंट धोरण क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल अर्थात CAB द्वारे लागू केले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, BCCI ने भारत-इंग्लंड टी२० मालिका होणाऱ्या सर्व राज्यांतील क्रिकेट संघटनांना त्यांची नवीन धोरणे पाठवली आहेत. त्यावर अंमलबजावणीचे कामही सुरू झाले असून CAB कडून त्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. नव्या नियमावली नुसार, आता भारतीय क्रिकेटर्सना एक गोष्ट दिली जाणार नाही, जी आतापर्यंत दिली जात होती.
कोणत्याही खेळाडूसाठी वेगळी कार नाही!
भारत आणि इंग्लंड यांच्यात २२ जानेवारीपासून पहिला टी२० सामना होणार आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी पुष्टी केली की BCCI ने केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार संघटनेच्या वतीने कामकाजाला सुरुवात झाली आहे. बीसीसीआयच्या १० पॉइंट पॉलिसीनुसार, CAB कोणत्याही खेळाडूसाठी स्वतंत्र वाहन प्रदान करणार नाही. भारतीय संघासाठी टीम बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. खेळाडू कितीही बडा, दिग्गज किंवा अनुभवी असला तरीही कोणालाच खासगी वाहन दिले जाणार नसल्याचे गांगुली यांनी पीटीआयला सांगितले.
सर्व खेळाडूंचा एकत्रित प्रवास
CAB अध्यक्ष गांगुली म्हणाले की, ते फक्त मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील, ज्या स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व खेळाडू संघासोबत प्रवास करतील. कोणत्याही खेळाडूला संघापासून वेगळे ठेवले जाणार नाही. BCCI ने बनवलेल्या १० पॉइंट्स पॉलिसीपैकी एक म्हणजे सर्व खेळाडू फक्त टीम बसने मॅच किंवा सराव सत्रासाठी जातील. या सर्व नियमांचे प्रत्येक क्रिकेट संघटना तंतोतंत पालन करेल.
BCCI ने दिलेले निर्देश खालीलप्रमाणे...
- राष्ट्रीय संघातील प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य असेल.
- विदेशी दौऱ्यांमध्ये खेळाडूंसोबत कुटुंबीय सदस्य केवळ दोन आठवडे राहू शकतील.
- विदेशी दौऱ्यांमध्ये वैयक्तिक स्टाफ आणि व्यावसायिक फोटोशूटवर बंदी.
- दौरा सुरू असताना कोणत्याही खेळाडूला स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी नसेल.
- दौरा किंवा सामना लवकर संपल्यानंतर खेळाडूंना लवकर परतण्याची मुभा मिळणार नाही.
- अपवादात्मक सूट मिळवण्यासाठी निवड समिती अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षकांद्वारे पूर्वसूचना द्यावी लागेल.
- या नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर बीसीसीआयद्वारे योग्य कारवाई करण्यात येईल.
- कोणत्याही खेळाडूविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सर्व हक्क बीसीसीआयकडे असतील.
- या हक्कांनुसार संबंधित खेळाडूला आयपीएलसह बीसीसीआयच्या सर्व स्पर्धांपासून दूर ठेवण्यात येईल.
- दोषी खेळाडूच्या केंद्रीय करारानुसार मिळणाऱ्या सामना शुल्कात कपात करण्यात येईल.