BCCI New President : वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटर रॉजर बिन्नी यांच्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. लवकरच बीसीसीआयला नवा बॉस मिळणार असून ते नाव जवळपास पक्के झाल्याची माहिती समोर येत आहे. २८ सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा नियोजित आहे. तत्पर्वी शनिवारी २० सप्टेंबरला दिल्लीत एक औपचारिक बैठक पार पडली. यात नवा अध्यक्ष कोण? यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
माजी क्रिकेटर होणार BCCI चा नवा 'कारभारी'
पीटीआयच्या वृत्तानुसार, या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांना निमंत्रित करण्यात आले होते. यात दिल्लीचा माजी क्रिकेटर आणि जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिशनमध्ये प्रशासकाच्या कामाचा अनुभव असणारा चेहरा मिथुन मनहास (Mithun Manhas ) आणि भारताचे माजी फिरकीपटू आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे (KSCA) अध्यक्ष रघुराम भट्ट (Raghuram Bhat ) यांचा समावेश होता.
नेमकी कुणाची लागणार वर्णी?
शनिवारी झालेल्या बैठकीत रिक्त पदासाठी इच्छुक उमेदवारांपैकी मिथुन मनहास यांचे नावच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पक्के झाल्याचे समजते. ६७ वर्षीय रघुराम भट्ट हे भारताकडून दोन कसोटी सामने खेळले आहेत. पण त्यांचे नाव कुठंतरी मागे पडले आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही पुन्हा BCCI च्या अध्यक्षपदासाठी इच्छुक होता. पण दिल्लीत पार पडलेल्या बैठकीसाठी त्याला निमंत्रण नव्हते. त्यामुळे तो या शर्यतीतून बाहेर पडल्याचेही दिसते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सोडलीये खास छाप, प्रशिक्षक अन् प्रशासकीय अनुभव
मिथुन मनहास (Mithun Manhas) हे मूळचे जम्मू काश्मीरचे. पण क्रिकेटरच्या रुपात या चेहऱ्याची ओळख दिल्ली रणजी संघाचा कर्णधार आणि सलामीचा बॅटर अशी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० पेक्षा अधिकच्या सरासरीनं या माजी क्रिकेटरच्या नावे ९ हजार ४८० धावांची नोंद आहे. २००७-०८ च्या हंगामात दिल्लीच्या संघाला रणजी करंडक स्पर्धा जिंकून देण्यात या चेहऱ्याने महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता. IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि पुणे वॉरियर्स आणि पंजाबच्या संघातून खेळाडूच्या रुपात दिसल्यावर प्रशिक्षण आणि प्रशासकाच्या रुपातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.